उमेश पेंड्याला ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सुगम क्षेत्रात व शहरी भागात शासकीय सेवा देताना फारशी कसरत करावी लागत नाही. मात्र आदिवासीबहुल दुर्गम भागात सेवा देताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातच अशी सेवा बजावताना जीवाची पर्वा न करता अनेक कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. कमलापूर भागात वनविभागाच्या सेवेत कार्यरत असलेले पती-पत्नी व इतर कर्मचाऱ्यांना कंबरभर पाण्यातून पावसाळ्यात वाट काढावी लागते.
वनविभागाची सेवा म्हटले की, जंगलात जाऊन काम करणे आले. जंगलाचे संरक्षण, वनतस्करी रोखणे, वन्यप्राण्यांची शिकार थांबविणे यासह नवीन रोपवन लावून पर्यावरणाचा संतुलन ठेवणे आदी कामे प्रामुख्याने करावी लागतात. अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरातील जंगलात सेवा देण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या भागात पक्के रस्ते नाही. अनेक ठिकाणी नदी, नाले पडतात. पुलांचा अभाव असल्याने पाण्यातूनच पावसाळ्यात वाट काढत कर्तव्यावर पोहोचावे लागते. अशाप्रकारे अनेक संकटांचा सामना करत कमलापूर भागात वनरक्षक दाम्पत्य गेल्या चार-पाच वर्षांपासून सेवा देत आहेत.
सिरोंचा वनविभागाअंतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र राजाराम भागात मागील चार महिन्यांपासून वनरक्षक रंजीता गोविंदा दुगा व सी.डब्ल्यू.कांदो सेवा देत आहेत. राजाराम परिसरात रोपवनाची कामे सुरू आहेत. राजाराम येथून सहा किमी अंतरावर सूर्यापल्ली गावाच्या पलिकडे नाला आहे. या भागात राखीव जंगलात रोवन तयार करण्यात आले असून निंदणाचे काम सुरू आहे. या कामावर वनरक्षक चरणदास कांदो यांना लक्ष ठेवावे लागते. रंजिता दुग्गा (कांदो) या तिमरम नियतक्षेत्रात तर त्यांचे पती चरणदास कांदो हे राजाराम नियतक्षेत्रात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी हे दाम्पत्य आलापल्ली वनविभागात कार्यरत होते. त्याठिकाणी त्यांनी आठ वर्ष सेवा दिली. गेल्या १३ वर्षांपासून हे दाम्पत्य दुर्गम भागात वनविभागात सेवा देत आहेत.
पावसाळ्यात हा अनुभव नित्याचावनरक्षक चरणदास कांदो व रंजीता दुग्गा (कांदो) हे इतर कर्मचाऱ्यांसह २५ सप्टेंबर रोजी शुक्रवारला सूर्यापल्ली गावानजीकच्या कक्ष क्र.१४२ रोपवनक्षेत्रात सकाळी गेले होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पायी जावे लागते. राजाराम येथून ६ किमी अंतरावर हे रोपवन आहे. त्या ठिकाणी १८ मजुरांमार्फत निंदणाचे काम सुरू होते. कामाची पाहणी करून सायंकाळी ५.३० वाजता परत येताना अचानक जोरदार पाऊस आला. या पावसाने सूर्यापल्ली गावानजीकच्या नाल्याला पाणी चढले. मोठी हिंमत ठेवून या पाण्यातून वाट काढावी लागली, असे रंजिता दुग्गा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरवर्षीच्या पावसाळ्यात हा अनुभव आमच्यासाठी नेहमीचाच आहे, असेही त्या म्हणाल्या.