लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : जिल्ह्याच्याच नाही तर राज्याच्या एका टोकावर असलेल्या गोल्लगुडम ग्रामपंचायतमधील आसमटोला आणि गर्रेपल्ली या गावातील नागरिकांना गेल्या पाच दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेसोबतच त्यांच्या घशाची कोरड वाढून त्यांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आसमटोला गावात तीन बोअरवेल आहेत. त्यावर विद्युत मोटार लावून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे बोअरवेलमधील पाणी बाहेर काढणे या गावकऱ्यांसाठी अशक्य झाले आहे.वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे या भागातील वीज पुरवठा कधीही खंडीत होतो. पण आता ट्रान्सफार्मरच जळाल्यामुळे वीज पुरवठा पाच दिवसांपासून पूर्णपणे खंडीत आहे. गर्रेपल्ली व आसमटोला येथे आठवड्यातून दोन दिवस नेहमीच वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. अशावेळी गावातील नागरिकांना नल्लावागू या नाल्यातून पाणी आणावे लागते. ट्रान्सफार्मरची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली असल्याचे कनिष्ठ अभियंता मंगेश मेश्राम यांनी सांगितले.
पाण्यासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 5:00 AM