उडाण फाऊंडेशनचा पुढाकार : १०० हून अधिक जणांना कपडे वाटपआलापल्ली : आपल्या कुटुंबीयांसमवेत रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकून आलापल्ली येथे मागील काही दिवसांपासून ठाण मांडून असलेल्या भटक्या जमातीतील महिला व पुरूषांना उडाण फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी कपड्यांचे वितरण करण्यात आले. मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडी वाढली आहे. अशा स्थितीतही भटक्या जमातीतील नागरिक आलापल्ली येथील पटांगणात छोट्या झोपड्या थाटून वास्तव्य करीत आहेत. येथूनच ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या जमातीतील नागरिकांकडे आवश्यक कपडे नसल्याची बाब फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच फाऊंडेशनच्या वतीने भटक्या जमातीतील बांधवांच्या अस्थायी वस्तीत जाऊन त्यांना ब्लँकेट व गरम कपड्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंडू भांडेकर, फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष मंथनवार, उपाध्यक्ष डॉ. चरणजीतसिंह सलुजा, सचिव रोमित तोंबर्लावार, कोषाध्यक्ष विशेष भटपल्लीवार, पवन गुप्ता, कुलकर्णी, गणेश बोधनवार, व्यंकटरमन गंजीवार उपस्थित होते. आलापल्ली येथे आपले कुणीही नसताना येथील वासीयांनी आम्हाला आपलेसे केले, असे उद्गार यावेळी भटक्या जमातीतील बांधवांनी काढले. (वार्ताहर)
भटक्यांना मिळाली ऊब
By admin | Published: January 12, 2017 12:57 AM