चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे वनविभागाच्यावतीने पर्यटकांसाठी वनोद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. या कामाला सुरूवात झाली असल्याची माहिती चामोर्शीचे वन परिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार यांनी लोकमतला दिली आहे. जिल्हा प्रशासनाने पर्यटन विकास योजनेंतर्गत चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथील वनोद्यानाला मंजुरी प्रदान केली आहे. सदर वनोद्यानाचे बांधकाम व सुशोभीकरण करण्याचे काम चामोर्शी वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे सोपविण्यात आले आहे. मार्र्कंडादेव येथे श्री मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणासाठी व पर्यटकांसाठी श्री मार्र्कंडेश्वर मंदिराची वैभवशाली कला, कोरीव मूर्त्यांची कला व उत्तरवाहिणी नदीचे वैभव पाहिल्यानंतर पूजाअर्चा आटोपल्यानंतर आपल्या कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांसाठी वनोद्यानात येऊन विरंगुळा करता यावा या हेतुने वनोद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. या उद्यानात असलेल्या म्युझियम हाऊसमध्ये मार्र्कंडादेव नगरीचा, श्री मार्र्कंडेश्वराचा व उत्तरवाहिणी वैनगंगा नदीचा इतिहास तसेच मनोरंजनात्मक माहिती देणारे तैलचित्रही ठेवण्यात येणार आहे. मार्र्कंडादेव येथील मुख्य रस्त्याच्या अगदी बाजुला असलेल्या एक हेक्टर आर जागेमध्ये सदर भव्य वनोद्यानाचे काम सुरू करण्यात आले आहे. या जागेमध्ये जूना म्युझियम हाऊस आहे. या म्युझियम हाऊसची दुरूस्ती करण्यात आली आहे. या वनोद्यानामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारच्या खेळण्या, पर्यटकांना बसण्याकरीता खुर्च्या, विविध प्रकारची फुलझाडे, तसेच सावली देणारी झाडे, शोभीवंत दिसणारी झाडे लावण्याचे काम सुरू झाले आहे. उद्यानामध्ये फिरण्यासाठी नागमोडी रस्ते तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती चामोर्शीचे वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)
मार्कंडादेव येथे साकारतोय वनोद्यान
By admin | Published: November 02, 2014 10:34 PM