लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मुद्रांक (स्टॅम्प पेपर) हे शासनाचे एक महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. यापूर्वी शासकीय कामासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प चालत होता. मात्र १४ ऑक्टोबर रोजी महसूल व वनविभागाने राजपत्र निर्गमित केले आहे. त्यानुसार आता प्रत्येक शासकीय कामासाठी ५०० रुपयांचा स्टॅम्प आवश्यक करण्यात आला आहे. याचा फटका प्रत्येक व्यक्तीला बसणार आहे.
शासनाने १०० रुपयांचे मुद्रांक बंद केले. त्यामुळे आता सर्व व्यवहार ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करावे, असा अध्यादेश राज्यपालांनी १४ ऑक्टोबर रोजी जारी केला. महसूल मिळविण्यासाठी सरकारने मुद्रांकाची किंमत वाढविली असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, ५०० रुपयांच्या मुद्रांकाचा तुटवडा असल्याने १०० रुपयांचे मुद्रांक विकल्या जात आहेत. १०० रुपयांच्या मुद्रांकाचा जोपर्यंत साठा आहे. तोपर्यंत विक्री चालणार आहे.
१०० खरेदी करा सध्या ५०० रुपयांच्या मुद्रांकाचा तुटवडा आहे. १०० रुपयांच्या मुद्रांकाचीच जास्तीत जास्त विक्री होत असल्याने हेच मुद्रांक ठेवले जात होते. आता मात्र ५०० रुपयांचे मुद्रांक आवश्यक करण्यात आले आहे. विक्रेत्यांकडे १०० रुपयांचेच मुद्रांक आहेत. ते १०० रुपयांचे पाच मुद्रांक देत आहेत.
या कामांसाठी उपयोग प्रतिज्ञापत्र, भाडे करार विविध कर्ज प्रकरणांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, संचकार पत्र, विक्री करार अशा एक ना अनेक कामांसाठी सरसकट १०० रुपयांच्या मुद्रांकांचा वापर केला जात होता. परंतु त्याच कामांसाठी आता १६ ऑक्टोबरपासून सामान्यांना जादा ४०० रुपये मोजावे लागणार आहेत.
जिल्ह्यात २० मुद्रांक विक्रेते जिल्ह्यात एकूण २० मुद्रांक विक्रेते आहेत. त्यांच्या माध्यमातून दरदिवशी लाखो रुपयांचे मुद्रांक विकले जातात. जिल्ह्याच्या ट्रेझरी ऑफिसमध्ये मुद्रांक उपलब्ध होतात. विक्रेते सदर मुद्रांक तहसील कार्यालयात आणून विकतात. त्यांना कमिशन मिळत असते.
"प्रत्येक शासकीय कामासाठी आता ५०० रुपयांचे मुद्रांक शासनाने आवश्यक केले आहे. तसे राजपत्र शासनाने निर्गमित केले आहे. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. १०० चे पाच मुद्रांक जोडले तरी शासकीय काम होते." - व्ही. एम. बोरकर, दुय्यम निबंधक, गडचिरोली