कोरची : कृषी गोदामाचा वापर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिकाधिक भाव मिळवून देण्याकरिता तसेच शेतीला लागणारे खत, बियाणे, औषधी साठवणूक करून शेतकऱ्यांना योग्य भावाने वितरीत करता येते. त्यामुळे ग्रा. पं. ने पुढाकार घेऊन निर्माण करण्यात आलेल्या गोदामाचे संरक्षण करावे. कारण गोदाम हे शेतकऱ्यांसाठी आर्थिक उन्नतीचे माध्यम आहे, असे प्रतिपादन कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले.तालुक्यातील बेतकाठी येथे आयोजित कृषी गोदामाच्या लोकार्पण सोहळा व कृषी व पशुसंवर्धन मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर, सुनंदा आतला, कोरची पं. स. च्या सभापती शालिनी आंदे, उपसभापती गोविंद दरवडे, बेतकाठीचे सरपंच धनाऊराम काटेंगे, हकीमुद्दीन शेख, व्ही. जे. महाजन, गजभिये, भगत, सज्जनपवार, दमाहे, फुलझेले, डॉ. कुमरे, रामदास हारामी, राजेश नैताम आदी उपस्थित होते. बेतकाठी येथे कृषी गोदामाची निर्मिती झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांंंंंच्या शेतमालाची साठवणूक करण्यास मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळू शकते, असे प्रतिपादन पद्ममाकर मानकर यांनी केले. गोदामात शेतीतून उत्पादित केलेले माल साठवावे व धानाला योग्य भाव मिळाल्यानंतर बाजारात विक्री करावी, असे आवाहन सुनंदा आतला यांनी केले. दरम्यान व्ही. जे. महाजन यांनी कृषी गोदामाच्या व्यवस्थापनाबाबत माहिती देतांना समितीची रचना, व्यवस्थापन समितीचे अधिकार याविषयी माहिती दिली. मेळाव्याला बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
गोदाम हे आर्थिक उन्नतीचे माध्यम
By admin | Published: June 15, 2014 11:33 PM