कसनसूर-घोटसूर मार्ग : चौकशी करण्याची एटापल्ली तालुका काँग्रेसची मागणी एटापल्ली : जिल्हा परिषदेंतर्गत अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या रस्ते व पुलांची दुरूस्ती कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ मध्ये कसनसूर ते घोटसूर या रस्त्याचे काम करण्यात आले. या मार्गावर पूलही बांधण्यात आला. मात्र सदर कामात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप तालुका काँग्रेस कमिटी एटापल्लीचे अध्यक्ष संजय चरडुके यांनी केला आहे. चरडुके यांनी म्हटले आहे की, सन २०१६-१७ मध्ये कसनसूर-घोटसूर रस्ता व पूल बांधकामाचा कार्यारंभ आदेश घोटसूर व ग्रामपंचायतीला देण्यात आला. अंदाजे ११ ते १२ लाख रूपयांची बोगस मोजमाप पुस्तिका काढून १२ लाख रूपये हडप करण्यात आले. प्रत्यक्षात सदर रस्त्याच्या कामावर ३०२ ट्रिप मुरूम टाकण्यात आले. या मुरूमाची किमत १ लाख ५१ हजार रूपये आहे. कसनसूर-घोटसूर मार्गावरील नाल्याजवळचा खड्डा प्रत्यक्ष बुजविण्यात आला. यात रस्त्यालगतची माती टाकण्यात आली. यावर १० हजार रूपये खर्च झाला. तसेच घोटसूर लगतच्या तलावानजीकचा खड्डा बुजविण्यात आला. यावर अंदाजे १५ हजार रूपये खर्च झाले असतील. एकंदरीत कसनसूर-घोटसूर मार्गाच्या कामावर १ लाख ७० हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. मात्र या कामावर संबंधित यंत्रणेने ११ ते १२ लाख रूपये खर्च दाखवून गैरव्यवहार केला. त्यामुळे सदर रस्ता व पूल बांधकामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एटापल्ली येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय चरडुके यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
रस्ता व पुलाच्या कामात गैरव्यवहार
By admin | Published: May 01, 2017 2:15 AM