देसाईगंंज : नगर परिषदेचे काही ठिकाणी सार्वजनिक नळ आहेत. गरीब नागरिकांना नळाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सदर सार्वजनिक नळ आहेत. मात्र या एकाही नळाला तोट्या नाहीत. परिणामी नळ आल्यापासून ते शेवटपर्यंत पाण्याचा अपव्यय होत. आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
जिल्हाभरात जळाऊ लाकडांचा तुटवडा
गडचिरोली : जिल्हाभरातील वन विभागाच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठीही लाकडे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. लाकडांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
पशुपालन योजनांची जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
दुर्गम भागात केरोसीनचा पुरवठाच नाही
आष्टी : दुर्गम भागात बहुतांश नागरिक अजूनही चुलीवरच स्वयंपाक करतात. मात्र मागील काही दिवसांपासून केरोसीनचा पुरवठा कमी झाल्याने महिलांची अडचण वाढली आहे. केरोसीनचा पुरवठा करण्याची मागणी होत असतानाही शासन मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे.
मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करा
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
लिंक फेलमुळे कामे होताहेत प्रभावित
अहेरी : केंद्र शासनाने विविध योजनेची प्रक्रिया व प्रशासकीय कामे ऑनलाईन केली आहे. त्यामुळे योजनेचे अनेक लाभार्थी तसेच कर्मचारी सुध्दा बरीच कामे ऑनलाईन स्वरूपात करीत आहेत. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून बीएसएनएल तसेच खासगी कंपन्यांची लिंक फेल असल्याने ऑनलाईन कामे प्रभावित होत आहे.
आष्टी मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी
चामोर्शी : भेंडाळा-आष्टी मार्गावर अनेक गावे आहेत. भेंडाळा परिसरातील नागरिक आष्टीला जाण्यासाठी चामोर्शीवरून न जाता लखमापूर बोरी मार्गे जाणाऱ्या मार्गाने आष्टीला जातात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.
चातगाव-रांगीमार्गे अवैध वाहतूक जोरात
चातगाव : चातगाव रांगीमार्गे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. खासगी वाहनाने वाहतूक होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या भागात उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहीम सुरू करावी.
निधीअभावी पंचायत समितीचे महत्त्व घटले
आष्टी : ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून पंचायत समितीकडे बघितले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून पंचायत समितीला निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने पंचायत समितीचे महत्त्व कमी झाले आहे.
बसस्थानकनजीक टॅक्सींचा बाेलबाला
धानोरा : गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव मार्गावर सध्या चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. धानोराचे बसस्टँड रस्त्यालगतच आहे. स्वतंत्र जागा नसल्याने काळीपिवळी टॅक्सी व इतर खासगी बसेस या ठिकाणी अतिक्रमण करून दररोज अनेक प्रवासी बसवून वाहतूक सुरू आहे.
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण मिळेना
गडचिरोली : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र अनेक शाळांमधील शिक्षक तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. शाळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.
कार्यालयातील थम्ब मशीन सुरू करा
गडचिरोली : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील थम्ब मशीन बंद पडल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे उशिरा येणे सुरू झाले आहे. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळे थम्ब मशीन तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.
निस्तार डेपो देण्याची मागणी धूळखात
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावात त्वरित निस्तार डेपो देण्याची मागणी होत आहे. चामोर्शी भागातील नगारिकांना सांस्कृतिक कार्यक्रम व अंत्यविधीसाठी इतर ठिकाणाहून लाकडे आणावी लागत आहेत.
मंजूर टॉवर तत्काळ बांधण्याची मागणी
गडचिरोली : बीएसएनएलने गडचिरोली जिल्ह्यात नवीन ९० टॉवर मंजूर केले आहेत. या टॉवरचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे. बीएसएनएलने टॉवर उभारल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना मोबाईल सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.