सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा योजना बंद : अहेरीवरून नेतात नागरिक पाणी अहेरी : अहेरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्याने पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद असून नागरिकांना सात किमी अंतरावर असलेल्या अहेरी येथून पिण्याचे पाणी चारचाकी वाहनाने नेऊन तहाण भागवावी लागत आहे. आलापल्ली हे शहरवजा लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावाची लोकसंख्या १० हजारांच्या जवळपास आहे. गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. सदर योजना जीवण प्राधिकरण विभागाच्या मार्फतीने चालविली जाते. ग्रामपंचायत नियमितपणे वीज बिल भरत नसल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होऊन पाणी पुरवठा बंद होण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील वर्षीच्या उन्हाळ्यातही येथील पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. नागरिकांची ओरड वाढल्यानंतर ग्रामपंचायतीने काही प्रमाणात बिल भरले होते व त्यानंतर पुन्हा पाणी पुरवठा सुरू झाला होता. आणखी आॅक्टोबर २०१६ मध्ये ग्रामपंचायतीने विद्युत बिलाचे ९४ हजार रूपये भरले नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत केला आहे. तेव्हापासून पाणी पुरवठा बंद आहे. आलापल्लीवासीयांना हातपंप, विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही नागरिक विहीर व हातपंपाच्या पाण्याने आरोग्य बिघडेल या भितीने खासगी वाहनांच्या मदतीने अहेरी येथून पाणी नेतात. उन्हाळ्यात आलापल्ली येथील बहुतांश विहिरी आटत असल्याने पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
आलापल्ली गावात पाण्याचा दुष्काळ
By admin | Published: March 19, 2017 1:55 AM