गडचिरोली : उपविभाग धानोराअंतर्गत पोलीस मदत केंद्र कटेझरीच्या हद्दीतील अतिदुर्गम, अतिसंवेदनशील मानल्या जाणा-या मौजा गुरेकसा येथील महिलांना पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत होती. जीवघेण्या पायपीटीबरोबरच गावाच्या बाहेर असलेल्या ५० फूट खोल विहिरीतून पाणी काढताना महिलांची दमछाक होत असे. गडचिरोली पोलीस दलाच्या कटेझरी येथील प्रभारी अधिकारी व जवानांना सदर बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी महिलांची ही पायपीट थांबवण्यासाठी गावाबाहेर असणा-या विहिरीवर सबमर्सिबल पंप बसवून तेथून पाणी पाईपलाईनद्वारे थेट गावात आणले.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कटेझरी येथील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी गावाबाहेर असणा-या विहिरीवर सबमर्सिबल पंप बसवून विहिरीचे पाणी पाईपलाईनद्वारे गावात आणण्यासाठी उंच ठिकाणी पाण्याच्या दोन टाक्या बसविण्याचा निर्णय घेतला. त्यातून पाईपद्वारे ग्रामस्थांच्या घरासमोर पाणी पुरवठा करण्याची सोय केली. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा, मौजा गरेकसा येथील बोअरवेल नादुरुस्त असल्याने शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या.
सदर नादुरुस्त बोअरवेल गडचिरोली पोलीस दलाने दुरुस्त केल्याने बोअरवेलच्या माध्यमातून या शाळेत पाणी पुरवठा सुरळीत सुरु झाला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य फुलले. काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कटेझरी येथील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबवत मौजा कटेझरी येथील घरापर्यत पाणी पोहचविण्याची व्यवस्था केली होती. आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गुरेकसा येथील महिलांची पायपीट थांबविल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे.ग्रामस्थांनी मानले पोलीस दलाचे आभारमौजा गुरेकसा येथील महिला दारात नळाद्वारे आलेले स्वच्छ पाणी पाहून हरखून गेल्या. आपल्याला स्वप्नातही अशा पद्धतीने घरापर्यंत पाणी येईल असे वाटले नव्हते. पण पोलीस दलामुळे हे शक्य झाल्याचे सांगून त्यांचे आभार व्यक्त केले. या उपक्रमासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोमके कटेझरी येथील प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड व कर्मचाºयांनी पुढाकार घेतला.