चार वर्षांपासून होती शेतकऱ्यांना प्रतीक्षा : पुराडाच्या सती नदीवरील उपसा सिंचन प्रकल्प झाला सुरूकुरखेडा : शेतीला पाणी मिळावे या हेतूने तालुक्यातील पुराडा येथील सती नदीवर लघु उपसा सिंचन प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया २००६ मध्ये सुरू करण्यात आली. प्रकल्पासाठी कार्यालयीन प्रक्रियेच्या हेलपाटा संपल्यानंतर पाच वर्षानंतर २०११ मध्ये प्रकल्पाच्या बांधकामाला सुरूवात झाली. तीन महिन्यांतच बांधकामही पूर्ण झाले. परंतु प्रकल्प पाणी देण्यायोग्य पूर्णत्त्वास आला नाही. त्यामुळे २०१५ च्या सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन यंत्र सामग्री बसविण्यासह पाणी साठवणुकीची व्यवस्था श्रमदानातून करून प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना पुरवठा सुरू करण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांच्या १५ दिवसांच्या श्रमदानामुळेच पुराडा येथील उपसा सिंचन प्रकल्प पुन्हा सुरू झाला आहे. पुराडा येथील माजी जि. प. व माजी पं. स. सदस्य राजेंद्रसिंह ठाकुर यांच्या पुढाकारातून २००६ मध्ये पुराडा येथील सदी नदीवर लघु उपसा सिंचन प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले. पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी सिमेंटच्या पिशव्यांद्वारे बंधारा बांधून नदीचे पाणी पाईपद्वारे तलावात प्रवाहित करण्यात आले. यावेळी रवी मारगाये, नाना डोंगरवार, काशिनाथ नैताम, पतीराम नैताम, देशलाल ब्रम्हनायक, आकरे, डोकरमारे यांनी सहकार्य केले.अशी चालली उपसा सिंचन प्रकल्प प्रक्रिया२००६ मध्ये पुराडा येथे सती नदीवर लघु उपसा सिंचन प्रकल्पाच्या मंजुरीकरिता उपविभागीय कार्यालय (सिंचन) कुरखेडा येथे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर सदर प्रकल्पासाठी २०११ मध्ये तांत्रिक मान्यता प्राप्त झाली. ४ जून २०११ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रकल्पाच्या बांधकामाची प्रत्यक्ष सुरूवात १९ सप्टेंबर २०११ रोजी सुरू होऊन बांधकाम १८ डिसेंबर २०११ रोजी पूर्णत्त्वास आले. या प्रकल्पावर १३ लाख ३१ हजार रूपये खर्च करण्यात आले. ६० हेक्टर आर क्षेत्रात उभारण्यात आलेल्या प्रकल्पाची चाचणी ३० डिसेंबर २०११ मध्ये उपविभागीय अभियंता कुरखेडा यांनी घेऊन ग्राम पंचायत पुराडा यांच्याकडे ताबा दिला. परंतु ३० जुलै २०१५ या चार वर्षाच्या कालावधीपर्यंत प्रकल्पाचा कोणताही उपयोग शेतकऱ्यांना झाला नाही. येथील यंत्र सामग्रीही चोरीस गेली. माजी जि. प. सदस्य यांनी ३१ जुलै रोजी कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे जि. प. गडचिरोली भेट घेऊन पाणी वापर सहकारी संस्था स्थापन करून प्रकल्प चालविण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या व ७ आॅगस्ट रोजी सहकारी संस्था स्थापन करून नोंदणी करण्यात आली.
१५ दिवसांच्या श्रमदानाने मिळाले पाणी
By admin | Published: October 16, 2015 1:58 AM