कुरूड येथे पाणीटंचाईबाबत नागरिक ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करतात. याची दखल घेऊन नवनियुक्त सरपंच प्रशाला अविनाश गेडाम व उपसरपंच क्षितिज कमलेश उके यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता वासुदेव देवीकर यांना बोलावून चर्चा केली. तसेच गावात फिरून पाणीटंचाईची समस्या असलेल्या भागाची पाहणी केली. या समस्येवर तोडगा कशाप्रकारे काढता येईल, याविषयी मार्गदर्शनही केले. पाटील मोहल्ल्यातील पाणीपुरवठ्याचीसुद्धा पाहणी करण्यात आली. सरपंच प्रशाला गेडाम यांनी उन्हाळ्यापूर्वी पाणीसमस्या सोडवून नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य अर्चना ढोरे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम, पलटूदास मडावी, विलास पिलारे, शंकर पारधी, उमेश ढोरे, व्यवस्थापन समितीचे सदस्य विलास गोटेफोडे, विजय पारधी, पाणीपुरवठा कर्मचारी राजू पारधी व गावातील नागरिक हजर होते.