झिंगानूर चेक क्रमांक १ चेक क्रमांक २, मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. झिंगानूर चेक क्रमांक १ व २ व झिंगानूर माल येथे नवीन हातपंप मंजूर करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे. झिंगानूर येथे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण हाेते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही समस्या दरवर्षी उद्भवते. सध्या विहिरींची पाणीपातळी पूर्णत खालावली आहे. जुने हातपंप सुद्धा काेरडे असल्याचे दिसून येते. अनेक नागरिकांनी खासगी बाेअरवेलचे खाेदकाम केले आहे. परंतु २५० ते ३०० फूट खाेदकाम करुनही पाणी लागत नाही. माेटार सुरू केल्यानंतर अनेकांच्या बाेअरवेलमधून केवळ ३ ते ४ गुंड पाणी येते. त्यानंतर पाण्याची पातळी खाेलवर जाते. झिंगानूर परिसरात अनेक समस्या आहेत. वीज, पाणी, आराेग्य, शिक्षण व अन्य मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागताे. परिसरातील लाेकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकारी सुद्धा येथील समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दरवर्षी उद्भवणारी पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनही लक्ष घालत नाही, असा आराेप या भागातील नागरिकांचा आहे. पाणीटंचाईची समस्या सुटण्यासाठी झिंगानूर येथे नवीन हातपंप खाेदण्याची गरज आहे. किंवा पाणीटंचाई निर्माण हाेऊ नये यासाठी ठाेस उपाययाेजना करण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी समस्येची दखल घेऊन झिंगानूर येथील समस्या साेडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
पूल बांधकामांची प्रतीक्षाच
झिंगानूर परिसरातील मामीडीतोगू नाल्यावर पुलाचे बांधकाम पूर्णपणे झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी साेय झाली आहे. तर कोरेतोगू नाल्यावर मागील दाेन महिन्यांपासून बांधकाम सुरू झाले आहे. नैनगुडा नाल्यावर पुलाचा अभाव आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुरामुळे या मार्गावरील रहदारी ठप्प हाेते. येथील रपट्यावर खड्डे पडले आहेत. परिसरातील कंडिपहाडी नाल्यावरही पुलाचा अभाव आहे. रहदारीसाठी येथे बांधलेला रपटा उखडत आहे. सध्या येथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड त्रास हाेताे. त्यामुळे नाल्यांवर उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.