चामाेर्शी शहराची लाेकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे ; परंतु त्यामानाने शहरावासीयांना साेयीसुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. शहरात ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे अनेक कंपन्यांचे युवा कर्मचारी आहेत. खंडित वीजपुरवठ्यामुळे त्यांच्या कामात दररोज खंड पडत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा अनेकवेळा बंद पडते. मशीनच्या किमतीपेक्षा दुरुस्तीचा खर्च अधिक झाल्याची माहिती आहे. महिन्यातून १० ते १५ दिवस पाणीपुरवठा केला जाताे ; परंतु पाणीकर मात्र वार्षिक स्वरुपात वसूल केला जाताे. संबंधित यंत्रणेच्या बाेगस कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात ३३ केव्ही उपकेंद्र असतानाही तीच समस्या हाेती ; आता तर १३२ केव्ही असूनही तेच हाल आहेत. विद्युत अभियंते विविध कारणे सांगून वेळ काढून घेतात. १३२ केव्ही केंद्रातून एकाच फिडरने शहर, ग्रामीण भागात, उद्याेगासाठी व शेतातील कृषिपंपासाठी वीजपुरवठा केला जाताे. त्यामुळे ही समस्या निर्माण हाेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागासाठी वेगळे फिडर लावल्यास वीजपुरवठा खंडित होणार नाही. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चामाेर्शीत महिनाभरात १० ते १५ दिवस पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:25 AM