नळ योजनेत बिघाड : चामोर्शी शहरात पाण्यासाठी हाहाकारचामोर्शी : शहराला पाणीपुरवठा करणारी वैनगंगा नदीवरील लोंढूली घाटावरील पाणीपुरवठा योजनेतील विद्युत मोटार जळाल्याने चामोर्शी शहराचा पाणीपुरवठा मागील चार दिवसापासून बंद झाला आहे. त्यामुळे चामोर्शी शहरात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.नवतपांना सुरूवात होताच तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीसुद्धा वाढत चालली आहे. चामोर्शी शहरातील विहीर व हातपंपांची पाण्याची पातळी खोल गेली आहे. काही विहिरी तर पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. चामोर्शी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर पंप हाऊस निर्माण करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून नदीतील पाण्याचा उपसा करून पाण्याच्या टाकीमध्ये टाकले जाते. पंपहाऊसमधील विद्युत दाब वाढल्याने विद्युत मोटार चार दिवसापूर्वी जळाली. तेव्हापासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. चामोर्शीसह दहेगाव, शंकर हेटी, सावर हेटी, लालडोंगरी याच पाणीपुरवठा योजनेच्या मार्फतीने पाणीपुरवठा केला जाते. मोटारमध्ये बिघाड झाल्याने याही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिलांची पाण्यासाठी हातपंप व विहिरीवर गर्दी दिसून येत आहे. सदर पाणीपुरवठा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी प्रदीप भांडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, मोटार दुरूस्तीचे काम सुरू असून दोन दिवसात पाणीपुरवठा सुरू होण्याची माहिती दिली. (शहर प्रतिनिधी)
पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद
By admin | Published: May 30, 2014 12:02 AM