तीन वर्षे उलटली : पारडीवासीयांना एक किमी अंतरावरून आणावे लागते पाणी; ३५ लाखांचा खर्च व्यर्थकोटगल/पारडी : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत गडचिरोली तालुक्यातील पारडी (कुपी) येथे नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून काम हाती घेण्यात आले. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून पाणी टाकीचे काम निकृष्ट होत असल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रार केली. झालेल्या कामावर ३५ लाख रूपयांचा खर्चही करण्यात आला. मात्र गेल्या तीन वर्षांपासून पाणी टाकीचे काम पूर्णत: रखडले असल्याने पारडी (कुपी) वासीयांना उन्हाळ्यात एक किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१०-११ मध्ये दोन हजार लोकसंख्या असलेल्या पारडी (कुपी) गावासाठी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेच्या कामासाठी अंदाजे १ कोटी ३२ लाख ४२ हजार ९०० रूपये मंजूर करण्यात आले असून या कामाची निविदा किंमत १ कोटी ११ लाख ९८ हजार ८५२ रूपये नमूद करण्यात आले. ग्रामसभेची मंजुरी न घेता पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष तथा सरपंच व ग्रा. पं. सचिव यांनी संगनमत करून संबंधित कंत्राटदारास ३५ लाख रूपये अदा केले. दरम्यान कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाच्या सिमेंटचा वापर करून पाणी टाकीचे काम केले जात असल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी या कामाची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून कंत्राटदाराने पाणी टाकीचे काम बंद केले.या पाणी योजनेच्या टाकीच्या कामाची संबंधित यंत्रणेकडून चौकशी करण्यात आली असून संबंधित दोषींवर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तीन वर्षांचा कालावधी उलटूनही पारडी (कुपी) येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली नाही. परिणामी या गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. येथील ग्रामस्थांना पाणी मिळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ सदर नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करून ते पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
पाणी योजनेच्या टाकीचे काम रखडले
By admin | Published: June 02, 2016 2:56 AM