दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : डिएलएड् (पूर्वीचे डिएड्) प्रवेश म्हटला की आठ ते दहा वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत होती. या अभ्यासक्रमासाठी नंबर लागला म्हणजे लॉटरी लागल्यासारखे वाटत असे. मात्र गेल्या १० वर्षात या अभ्यासक्रमानंतर नोकरीची खात्री राहिली नसल्याने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली आहे. गडचिरोली जिल्ह्यात डीएलएड्ची खासगी व्यवस्थापनाकडून संचालित एकूण १७ महाविद्यालये आहेत. मात्र विद्यार्थ्यांअभावी हा अभ्यासक्रमच बंद पडण्याच्या मार्गावर आहे.मात्र गतवर्षी चार ते पाच महाविद्यालयात जेमतेम ५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. उर्वरित महाविद्यालय विद्यार्थी प्रवेशाविना ओसाड होती. यावर्षी केवळ ३० जणांनी अर्ज केले आहेत.जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील १७ डिएलएड् महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवले जाते. राज्य शासनाच्या वतीने सदर अभ्यासक्रमाच्या आॅनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.परिषदेच्या संकेतस्थळावर सुरूवातीला २० जूनपर्यंत आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत होती. मात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज न आल्याने ही मुदत वाढविण्यात आली. आॅनलाईन अर्ज करण्यासाठी ३० जून ही अंतिम मुदत परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे. २५ जूनपर्यंत जिल्ह्यातील १७ महाविद्यालयांसाठी केवळ ३० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला प्रतिसाद मिळत नसल्याने डीएलएड् महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात आले आहे.गतवर्षी आॅनलाईन प्रक्रियेतून तीन ते चार महाविद्यालयात ४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. व्यवस्थापन कोट्यातून सहा प्रवेश झाले होते. गडचिरोलीतील दोन व वडसातील एक अशा तीन डीएलएड् विद्यालयांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे प्रवेश होत आहे. इतर सर्व डीएलएड् महाविद्यालयात एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश झालेला नसल्याची खात्रीशीर माहिती आहे.गडचिरोलीत १० ते १५ टक्केच होतात प्रवेशखासगी व्यवस्थापनाच्या जिल्ह्यातील एकूण १७ डीएलएड् विद्यालयात एकूण १ हजार ५० जागा आहेत. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून सर्व विद्यालये मिळून विद्यार्थी प्रवेशाचा एकूण आकडा ५० ते ७५ दरम्यान राहात आहे. एकूण प्रवेश क्षमतेच्या तुलनेत जिल्ह्यात १० ते १५ टक्केच प्रवेश होत असल्याची माहिती डीआयईसीपीडीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. गडचिरोलीसह संपूर्ण महाराष्ट्रातील डीएलएड् कॉलेजची कमीअधिक प्रमाणात ही स्थिती आहे.यावर्षीपासून शासकीय डीएलएड्मधील प्रवेश बंदराज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हास्तरावर एक शासकीय डीएलएड् महाविद्यालय सुरू करण्यात आले. मागील वर्षीपर्यंत प्रत्येक शासकीय डीएलएड् महाविद्यालयात गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. मात्र यावर्षीपासून शासकीय डीएलएड् महाविद्यालयातील प्रवेश बंद करण्यात आले आहे. या संदर्भात एनसीईआरटीच्या संचालकांनी सर्व डीआयईसीपीडीच्या प्राचार्यांना जून महिन्यात पत्र पाठविले आहे. त्यामुळे शासकीय महाविद्यालयात यंदा प्रवेश होणार नाही.गेल्या काही वर्षांपासून डीएलएड् प्रवेशाला विद्यार्थ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी विद्यार्थी प्रवेश न झालेले जिल्ह्यातील सर्वच डीएलएड् कॉलेज कायम आहे. सदर कॉलेजना दरवर्षी माहिती अपलोड करावी लागते. प्राचार्य पद भरती करावी लागते. राष्ट्रीय शिक्षण परिषदेकडे (एनसीटीई) संबंधित संस्थेने कॉलेज बंद करण्याबाबत परवानगी मागावी लागते. त्यानंतर सदर परिषद व शासन प्रवेश होत नसलेल्या डीएलएड् महाविद्यालयाची मान्यता रद्द करू शकतात. संस्थेच्या प्रस्तावाशिवाय कॉलेजची मान्यता काढता येत नाही.- एस. ए. पाटील, प्राचार्य, डीआयईसीपीडी गडचिरोली
अध्यापक विद्यालये बंद होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:33 PM
डिएलएड् (पूर्वीचे डिएड्) प्रवेश म्हटला की आठ ते दहा वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत होती. या अभ्यासक्रमासाठी नंबर लागला म्हणजे लॉटरी लागल्यासारखे वाटत असे. मात्र गेल्या १० वर्षात या अभ्यासक्रमानंतर नोकरीची खात्री राहिली नसल्याने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली आहे.
ठळक मुद्देडीएलएड्साठी केवळ ३० प्रवेश अर्ज : ९०० वर जागा राहणार रिक्त, १७ विद्यालयांचे भवितव्य धोक्यात