कृष्णा गजबे यांची माहिती : रुग्णवाहिकेतून आरोग्य सेवा मिळावी लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाला १०८ क्रमांकाची मोफत सेवा देणारी रुग्णवाहिका नुकतीच मिळाली. सदर रुग्णवाहिका मिळण्यासाठी आपण सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. माझ्यासोबत इतर पदाधिकारी व नागरिकांनीही पाठपुरावा केला असेल, सर्वांच्या सहकार्याने रुग्णवाहिका मिळाली. यात श्रेय लाटण्याचा कुठलाही प्रश्न येत नाही, मिळालेली रुग्णवाहिका नवीन आहे की जुनी हे महत्त्वाचे नाही तर त्यामधील अत्याधुनिक सोयीसुविधा महत्त्वाची आहे, अशी माहिती आ.कृष्णा गजबे यांनी बुधवारी आरमोरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जुन्या रुग्णवाहिकेचे आ.गजबे यांनी लोकार्पण केल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर गजबे यांनी त्या रुग्णवाहिकेमधील सुविधांची माहिती दिली. ज्या दिवशी या रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले, त्या दिवशी आपण अर्धा-पाऊन तास रुग्णवाहिकेत बसून सर्व सोयीसुविधांची पाहणी केली. त्यामुळे रुग्णांना चांगली सेवा देण्यास ही रुग्णवाहिका सज्ज असल्याचे ते म्हणाले. ही रुग्णवाहिका जुनी असली तरी उपयोग चांगल्या पद्धतीने कसा करता येईल, याचा विचार नागरिकांनी करावा, असे ते म्हणाले. वडसाच्या ग्रामीण रुग्णालयाला १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका मिळण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून येत्या एक ते दीड महिन्यात रुग्णवाहिका मिळेल, तसेच डॉक्टरांचे रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.
श्रेय लाटण्याचा आपला हेतू नाही
By admin | Published: June 22, 2017 1:31 AM