मनाेज ताजनेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतरासारखे अनेक नियम पाळले जात आहेत. त्यामुळेच कोरोनाला हरवून आपण आजही जिवंत आहोत. वाघापासून बचाव करणे त्यापेक्षा किती तरी सोपे आहे. जंगल हे त्याचे हक्काचे घर आहे. त्यामुळे जंगलात वाघ राहणारच आहे, असे गृहीत धरून माणसांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास वाघापासूनही स्वत:चा बचाव करणे शक्य आहे, अशी जनजागृती वन विभागाकडून केली जात आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त असल्यामुळे समस्त नागरिकांनी वाघापासून बचावाचा कानमंत्र लक्षात ठेवल्यास हल्ला आणि त्यात बळी जाण्याच्या घटना टाळता येणार आहेत. कोणत्या सूचनांचे पालन करावे याची माहिती देणारे जनजागृतीपर पोस्टर वन विभागाने गावागावात लावले आहेत. जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत १५ पेक्षा जास्त नागरिकांचा वाघांच्या हल्ल्यात बळी जाण्याच्या घटनेने नागरिक धास्तावले आहेत. या हल्ल्यांच्या घटनांवर नजर टाकल्यास बहुतांश हल्ले हे परवानगीशिवाय प्रवेश न करता येणाऱ्या राखीव जंगलात झाल्याचे दिसून येते. कोणत्याही वाघाने गावात किंवा गावाशेजारी येऊन हल्ला केलेला नाही. त्यामुळे या घटनांसाठी काही प्रमाणात मानवीय चुका जबाबदार ठरत आहेत. जंगलात जाणे ही जिल्ह्यातील नागरिकांची अपरिहार्यता असली तरी जंगलात वावरताना काही नियम पाळल्यास वाघांचे हल्ले टाळणे शक्य होणार आहे.वाघांचा सुगावा लागल्यास तातडीने माहिती मिळावी, यासाठी अमिर्झा, आंबेशिवणी या संवेदनशील बिटमध्ये ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. दिवसातून दाेन वेळा त्याची तपासणी हाेते. याशिवाय गस्तीपथक तैनात असून पहाटे ४ वाजतापासून ते कामी लागत आहेत. यामुळे सतर्कता वाढली आहे.
वाघापासून वाचण्यासाठी ही घ्या खबरदारी- पहाटे व सायंकाळी अंधार पडल्यावर गावाबाहेर, शेतात जाण्याचे टाळावे.- जंगलाजवळच्या शेतात एकट्याने काम करू नये.- शेतात वाकून किंवा बसून कामे करताना जास्त खबरदारी घ्यावी. उभ्या माणसावर वाघ हल्ला करत नाही.- शेतात जाताना हातात काठी, कुऱ्हाड असावी. कामे करताना मोबाइलवरील गाणी किंवा इतर कशाचा आवाज करत राहावा.- शेताला काटेरी, साडीचे कुंपन घालावे. बांधावर काटेरी वनस्पतीची लागवड करावी.- नागरिकांनी उघड्यावर शौचास जाऊ नये.गुराख्यांनी हे करावे- दाट जंगलात जनावरांना चराईसाठी नेऊ नये. त्यांच्या गळ्यात घंटी बांधावी. जनावरांवर वाघाने हल्ला केल्यास बचावासाठी मधे पडू नये. - वाघ जवळ दिसला अथवा त्याने प्राण्यावर हल्ला केला तर जोराने काठी, कुऱ्हाड झाडावर, दगडावर आपटावी. मोठ्याने आवाज केल्यास वाघ पळू शकतो.- जवळ असलेल्या काठीला घुंगरू लावावे. वेळोवेळी त्याचा आवाज करावा. मोबाईल असल्याचे मोठ्याने गाणी लावावी.
एका वाघाला पकडल्यास दुसरा तयार होईलमोठे वनक्षेत्र असूनही गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षे वाघांचे अस्तित्व नव्हते. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढल्यामुळे दोन वर्षांपासून ब्रह्मपुरी भागाकडून काही वाघ गडचिरोली जिल्ह्याकडे वळले आहेत. अनेक वर्षे हिंस्र पशू नसल्यामुळे या जिल्ह्यातील लोक बिनधास्तपणे जंगलात वावरत होते. त्यामुळे वाघांच्या सवयी, स्वभाव याची कल्पना नसल्यामुळे त्याच्या हल्ल्यापासून बचाव कसा करायचा, याची माहिती नागरिकांना नाही; परंतु आता ही माहिती जाणून घेणे गरजेचे झाले आहे. वन विभागाकडून हल्लेखोर वाघाला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न सुरू असले तरी हा कायमस्वरूपी उपाय नाही. दोन वर्षांत वाघांची संख्या वाढल्यामुळे कोणाकोणाला पकडणार? असा प्रश्न वन विभागासमोर निर्माण झाला आहे.
वाघाच्या हल्ल्यांसाठी जबाबदार कोण?- अनेक नागरिकांनी शेतीचे क्षेत्र वाढवत वनजमिनीवर अतिक्रमण केले आहे. शेतात जाण्यासाठी पूर्वीचा पांदण रस्ताही ठेवला नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना जंगलाच्या वाटेने शेतात जावे लागले. गुरांची चराईसुद्धा जंगलात केली जाते. त्यामुळे वाघांचे हल्ले होत आहेत.- विशेष म्हणजे वाघाला माणसाच्या रक्ताची चटक लागली, तो माणसांच्या नरडीचा घोट घेतो असे म्हटले जाते ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांनी सांगितले. वाघ केवळ श्वास रोखून मारण्यासाठी मानेला जबड्यात पकडतो. माणसाचे मांस त्याला आवडत नाही. तसे असते तर वाघांनी गावांमध्ये येऊन माणसांवर हल्ले केले असते, असे वन विभागाने स्पष्ट केले.
गडचिरोलीच्या जंगलात आता पूर्वीसारखी बिनधास्तपणे वावरण्यासारखी स्थिती राहिलेली नाही. त्यामुळे इतक्या वर्षात आम्हाला काही झाले नाही, आता काय होणार? अशा गैरसमजात कोणीही राहू नये. असे असले तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास हल्ल्यापासून बचाव होऊ शकतो. सर्वांनी हा मुद्दा समजून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.- डॉ. किशोर मानकर,वनसंरक्षक, गडचिरोली वनवृत्त