लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मार्च महिन्यापासून जंगलांना आगी लागत असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरित परिणाम पर्यावरण होत आहे. वणव्यामुळे जिल्ह्यातील मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जंगलांना आगी लावणाऱ्यांवर वन विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.मागील १० वर्षांपासून जंगलांना आगी लावण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी मार्च महिन्यात खुटकटाई करण्यात येत होती. पण आता खुटकटाई नावापुरतीच राहिली आहे. खुट कटाईचा त्रास वाचविण्यासाठी व तेंदूच्या रोपांना जास्त खुटवे येण्याच्या मोहापायी जंगलांना चक्क आगही लावल्या जाते. मोहफूल गोळा करणारी मंडळी झाडाखालचा पालापाचोळा जाळतात. त्यामुळे ही आग पसरून वणवा लागतो.१० वर्षांपूर्वी मोहफुले गोळा करणारी मंडळी पालापाचोळा जाळीत असतात. पण त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागत नव्हती. शेतकरी शेतीची म्हशागत करण्यासाठी शेतातील गवत जाळतात. पण शेतकरी एप्रिल व मे महिन्यात गवत जाळून शेताची स्वच्छता करतात. मार्च महिन्यात हे काम केले जात नाही. मात्र आता मार्च महिन्यातच जंगलांना आगी लागत असल्याने संपूर्ण गवत पालापाचोळा जळून जातो. ज्याच्यावर विविध प्रकारचे किटक, सरपटणारे प्राणी, जमिनीवर अंडी देणारे पक्षी, ससा, हरीण, काळवीट, निलगाय आदींसारख्या शाकाहारी प्राणी वणव्यामुळे नामशेष होत आहेत. या शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असणारे वाघ, बिबट आदीसारखे हिंस्त्र प्राणी भक्ष शोधण्यासाठी गावाकडे धाव घेतात.ज्या ग्रामसभेची हद्दित जंगलाला आग लागत असेल ती आग विझविण्याची जबाबदारी त्या-त्या ग्रामसभेची राहिल. जर आग विझविली नाही तर त्या ग्रामसभेविरूध्द कार्यवाही होणे आवश्यक आहे. संबंधित दोषी व्यक्तीवरही कारवाई व्हावी, आग लावणाऱ्याचे नाव जो सांगेत असेल त्याचे नाव गोपनिय ठेवून त्याला शासनाकडून रोख बक्षीसे देण्याची योजना अंमलात आणणे आवश्यक आहे.या गोष्टी केल्याशिवाय जंगलाला आगी लागण्याचे प्रकार बंद होणार नाही.झाडांना वाचविण्याची जबाबदारी ग्रामसभांची नाही का?मोहफुले गोळा करणारी मंडळी असो की, तेंदूपत्ता संकलन करणारी मंडळी असो, सर्वच लोक ग्रामसभा व महाग्रामसभांशी जुळलेले आहेत. तेंदूपत्ता हंगामापासून मिळणारा पैसा ग्रामसभांना मिळतो. मग जंगल जळत असेल तर तो विझविण्याची जबाबदारी ग्रामसभेची नाही का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. कोरची तालुक्यातील मसेली परिसरातील नवेझरी, पल्यालजोब, मुरकुटी आदीसह आठ गाव परिसरातून टॉवर लाईन जाणार आहे. परिणामी या गाव परिसरातील जेवढे वृक्ष तोडल्या जातील, त्या वृक्षाच्या मोबदल्यात या आठ ग्रामसभांना चार कोटी रुपये दिले जाणार असल्याची माहिती आहे. आर्थिक लाभ होत असलेल्या ग्रामसभांची जंगल वाचविण्याची जबाबदारी नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वणव्यामुळे मौल्यवान वनसंपत्ती होताहेत नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:00 PM
कोरची तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मार्च महिन्यापासून जंगलांना आगी लागत असल्याचे दिसून येत आहे. याचा विपरित परिणाम पर्यावरण होत आहे. वणव्यामुळे जिल्ह्यातील मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जंगलांना आगी लावणाऱ्यांवर वन विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ठळक मुद्दे१० वर्षांपासून प्रमाण वाढले : दोषींवर कारवाई करण्याची मागणी