लाेकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : ढगाळ वातावरणामुळे धान पिकावर आलेल्या तुडतुड्याचा नाश करण्यासाठी आणलेल्या फवारणीच्या औषधीत एका शेतकऱ्याने तणनाशक मिसळले. त्या द्रावणाची धानावर फवारणी करताच ऐन भरीवर असलेले अडीच एकरातील धानपीक सुकून जात असल्याने त्या शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न रंगवत असताना तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रकार जवळच असलेल्या शंकरनगर येथे घडला.हिरामण मल्लिक असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. मल्लिक यांनी स्वतःच्या शेतातील धानावर तुडतुडा प्रतिबंधक ट्रॅकर हे कीटकनाशक फवारणी करण्यासाठी आणले होते. पण त्यात ग्लायटोजेन हे तणनाशक मिसळून फवारणी केली. त्यामुळे शेतातील संपूर्ण धान तण नाशकासारखे सुकून जात आहे. आतापर्यंत हिरवेगार दिसणारे पीक अचानक सुकून जाऊन पिवळे पडत असल्याने मल्लिक यांच्यावर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली.
पीकही जाणार, केलेला खर्चही जाणार
या धान लागवडीसाठी झालेला खर्च, मेहनत पाण्यात जात असल्याने सदर शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. छोट्याशा चुकीमुळे लोंबीला आलेले धानपीक तणनाशकामुळे करपल्यासारखे झाले आहे. यात सदर शेतकऱ्याचे ८० हजार रुपयांचे नुकसान हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे वर्षाचे बजेट काेलमडणार आहे.
शेतात कीटकनाशकाची फवारणी करताना कृषिमित्रांचा, कृषी केंद्र संचालकांचा किंवा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊनच फवारणी करावी. अन्यथा अंगावरचे सोने गहाण ठेवून, बँकांचे कर्ज घेऊन शेती व्यवसायावर केलेला खर्च पाण्यात जाऊन कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते, हा धडा या घटनेने दिला आहे.