गडचिरोली : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कंत्राटी कर्मचा-यांसंदर्भात गेल्या ९ फेब्रुवारीला काढलेल्या परिपत्रकातील अटी कंत्राटी कर्मचा-यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणा-या आहेत. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करावे या मागणीसाठी जिल्हाभरातून आलेल्या दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचा-यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून शासनाचा निषेध केला. यावेळी विविध लक्षवेधी नारे देऊन कंत्राटी कर्मचा-यांची व्यथा मांडण्यात आली.‘आमदाराची पोरगी काय म्हणते, कंत्राटी नवरा नाय म्हणते’, ‘एकच नारा कायम करा,’ ‘रद्द करा रद्द करा, जाचक परिपत्रक रद्द करा’, या ना-यांसोबतच ‘सरकारला आमचं सांगण हाय, २०१९ ला निवडणूक हाय’ असा सूचक इशारा देणारा नाराही संपूर्ण मोर्चादरम्यान लावला जात होता. गडचिरोली शहराच्या इंदिरा गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा भर उन्हात ३ किलोमीटर पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्या ठिकाणी निवेदन देऊन सभा घेण्यात आली. ९ फेब्रुवारीला शासनाने काढलेले परिपत्रक कंत्राटी कर्मचा-यांचे हक्क आणि अधिकारांवर गदा आणणारे आहे. परिपत्रकातील जाचक अटींमुळे लाखो कंत्राटी कर्मचा-यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. ३ ते २० वर्षे प्रामाणिकपणे काम करणा-या अनुभवसंपन्न कर्मचा-यांच्या कुटुंबांना रस्त्यावर यावे लागेल. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करावे अशी मागणी करण्यात आली. शासनाच्या विविध विभागात रिक्त असलेल्या पदांवर या कंत्राटी कर्मचा-यांना समायोजित करून नियमित करावे अशीही मागणी करण्यात आली.
‘आमदाराची पोरगी काय म्हणते, कंत्राटी नवरा नाय म्हणते...’, कंत्राटी कर्मचारी एकवटले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 5:28 PM