गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे हातभट्टीची विषारी दारू प्राशन केल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आणि अनेकांची प्रकृती बिघडली. जिल्ह्यात दारूबंदी असून, दारूमुक्तीचाही गजर केला जात असताना घडलेली ही घटना दारूबंदीचा पुरता फज्जा उडाल्याचे स्पष्ट करणारी आहे, असा आरोप प्रदेश काॅंग्रेसच्या डॉक्टर सेलचे सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे यांनी केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात शासनाकडून दारूबंदी करण्यात आली आहे. मात्र यामुळे हातभट्टीवर दारू गाळणाऱ्यांचे व चोरट्या मार्गाने दारूची विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच विषारी दारूचा धोकाही बळावला आहे. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातही दारूमुक्तीच्या नावावर शासनाकडून कोट्यवधींचा निधी आणला जात आहे. निवडणुकाही दारूमुक्त करण्याचा गाजावाजा काही समाजसेवकांकडून केला जातो. मात्र, चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान उमेदवाराकडून दारूचे वाटप करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दारूबंदी असताना या जिल्ह्यात असे प्रकार घडत असतील तर दारूबंदी काय कामाची, असा सवाल डॉ.साळवे यांनी उपस्थित केला आहे.
शासनाकडूननजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठीही शासनाने पावले उचलावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.