गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. दरम्यान, शाळांकडून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल तयार करण्यात आला. १५ जुलै राेजी दहावीचा निकाल जाहीर झाला. आता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा साेडल्याचे दाखले तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, या दाखल्यावर नेमका काेणता शेरा व काेणती तारीख राहणार, याबाबत संभ्रम कायम आहे.
दहावी पास किंवा प्रथम श्रेणी, प्रावीण्य श्रेणी, तृतीय श्रेणीत उत्तीर्ण असा शेरा राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण विभाग व शिक्षकांमध्ये याबाबत मंथन सुरू आहे.
काेट...
आमची माेठी शाळा असून, विद्यार्थी संख्या प्रचंड आहे. त्यामुळे आतापासूनच टीसी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. केवळ महत्त्वाचा शेरा नाेंदविणे बाकी आहे. याबाबत वरिष्ठांच्या निर्देशानुसार कार्यवाही हाेईल.
- हेमंत रामटेके, प्राचार्य, शिवाजी हायस्कूल, गाेकुलनगर, गडचिराेली
...........
दरवर्षी संबंधित विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या श्रेणीनुसार शाळा साेडल्याच्या दाखल्यावर तशी नाेंद केली जाते. टीसीवर निकाल जाहीर झाल्याची तारीख नाेंदविली जाऊ शकते. टीसी तयार करण्याच्या कामाला वेळ आहे.
- सुनील चंदनगिरीवार, प्राचार्य, जि.प. हायस्कूल, गडचिराेली
............
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शाळा साेडल्याच्या दाखल्यावर दहावी उत्तीर्ण, असा शेरा राहणार आहे. गुणपत्रिका ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध झाल्या आहेत. शाळांमध्ये गुणपत्रिका प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतर शाळा साेडल्याचे दाखले तयार करून ते देण्याची कार्यवाही शाळांकडून हाेईल.
- आर.पी. निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, गडचिराेली
..............
माझा मुलगा वर्षभर शाळेत न जाता द्वितीय श्रेणीत दहावी उत्तीर्ण झाला. आता पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी हाेणारी सीईटी परीक्षेची तयारी सुरू आहे. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे दिसून येते. काेराेना संकटामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.
- वासुदेव चाैधरी
............
माझ्या मुलीने ऑनलाइन पद्धतीने दहावीचा निकाला पाहिला. यात ती उत्तीर्ण झाली. आता शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार व सीईटीतील गुणानुसार ती पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहे. टीसीवर नेमका कसा उल्लेख राहणार आहे, याबाबत फारशी माहिती नाही.
- कविता जुआरे