केवळ तीन संस्था कार्यरत : ५४ पैकी ४८ दूध सहकारी संस्था अवसायनात लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने अनुदानावर वितरित केलेल्या जर्सी गायींचा अल्पावधीतच झालेला मृत्यू, खासगी दूध उत्पादक कंपन्यांसोबत निर्माण झालेली स्पर्धा व शासनाचे कडक धोरण यामुळे मागील चार वर्षांत दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांना आपला गाशा गुंडाळावा लागला. सद्य:स्थितीत केवळ तीनच संस्था दुधाची खरेदी करीत असून सदर दूध सुद्धा एका खासगी कंपनीला विकले जात आहे. एकंदरीतच गडचिरोली जिल्ह्यातील दूध उत्पादनाला शेवटची घरघर लागली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुधाच्या भाववाढीचा लाभ जिल्ह्यातील किती दूध उत्पादकांना मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुग्ध उत्पादनाला चालना देण्यासाठी सन २०१२-१३ या वर्षापासून पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर जर्सी गायींचे वितरण करण्यात आले होते. २०१२-१३ ते २०१५-१६ या कालावधीपर्यंत सुमारे ७५ जर्सी गायींचे वितरण करण्यात आले. एक जर्सी गाय एका वेळेला १० ते ३० लीटरपर्यंत दूध देते. या जर्सी गायींच्या भरवशावर देसाईगंज, आरमोरी तालुक्यात दुग्ध उत्पादक सहकारी संस्था निर्माण झाल्या. गावठी गायी व म्हशींचे पालनकर्ते शेतकरीसुद्धा सहकारी संस्थांसोबत जोडल्या गेले. त्यामुळे २०१२-१३ पर्यंत आरमोरी, देसाईगंज या दोन तालुक्यांसह जिल्ह्याच्या इतर भागात एकूण ५४ दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वितरित करण्यात आलेल्या जर्सी गायींना जिल्ह्यातील वातावरण रूजले नाही. त्यामुळे जिल्ह्यात दाखल होताच त्यांची दूध उत्पादक क्षमता कमी झाली. काही गायींचा दूध उत्पादनापेक्षा अधिक खर्च होत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या गायींकडे दुर्लक्ष केल्याने त्या अल्पावधीतच मृत्यूमुखी पडल्या. परिणामी दुधाच्या उत्पादनात कमालीची घट निर्माण झाली. जिल्ह्यातील एकूण ५४ सहकारी संस्थांपैकी सद्य:स्थितीत ४८ सहकारी संस्था अवसायनात निघाल्या आहेत. केवळ सहा सहकारी संस्था सुरू असून त्यातील तीन सहकारी संस्था दुग्ध खरेदीशिवाय इतर व्यवसाय करीत आहेत. तीन सहकारी संस्था दुधाची खरेदी करीत आहेत. दर दिवशी केवळ १५० ते २०० लीटर दूध खरेदी केली जात आहे. मात्र सदर दूध सुद्धा शासनाला विक्री केले जात नसून ते एका खासगी कंपनीला विकले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुधाच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन अतिशय कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात खासगी कंपन्यांचे दूध आयात केले जात आहे. पशुसंवर्धन विभागाने गडचिरोली जिल्ह्यात मागील चार वर्षात सुमारे ७८ जर्सी गायींच्ंो वितरण केले आहे. जर्सी गायींना जिल्ह्यातील वातावरण अनुकूल होत नाही, हा शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. याच गायी नजीकच्या भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पालन करीत आहेत. जर्सी गाय १० ते ३० लीटरपर्यंत दूध देते. एका पशुपालकाकडे एक जरी गाय असली तरी त्याला दिवसाची पुरेशी मजुरी पडू शकते. या उद्देशाने शेतकऱ्यांना जर्सी गायींचे वितरण केले जात आहे. २०१७-१८ या वर्षातही ५२ जर्सी गायींचे वितरण केले जाणार आहे. याचा लाभ पशुपालकांनी घ्यावा. - आर. के. हिचामी, स्टॉक सुपरवायझर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, गडचिरोली खासगी कंपन्यांमुळे दुग्ध संस्थांचा टिकाव अशक्य दूध उत्पादनात खासगी कंपन्यांचा शिरकाव झाल्यापासून दुग्ध सहकारी संस्थांना घरघर लागण्यास सुरुवात झाली. खासगी कंपन्यांच्या लवचिक धोरणासमोर दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांचे कडक धोरण टिकाव धरू शकले नाही. खासगी कंपन्या दुधात थोडाफार फरक असला तरी खरेदी करतात. मात्र दुग्ध उत्पादक संस्था खरेदी करीत नव्हत्या. त्याचबरोबर खासगी कंपन्यांच्या वतीने दूध उत्पादकाला त्याचवेळी पैसे दिले जात असल्याने शेतकरी वर्ग दुग्ध उत्पादक संस्थांऐवजी खासगी कंपन्यांना दूध विक्री करण्यास पसंती दर्शवित असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकरी शहरांमध्ये स्वत:च दुधाचे वितरण करीत आहेत. आरेच्या दुधाचा दीड वर्षांपासून पुरवठा बंद गडचिरोली शहराजवळील कनेरी येथील दूध शीतकरण केंद्र मागील अनेक वर्षांपासून बंद पडले आहे. तेव्हापासून गडचिरोली शहरात आरे या राज्य शासनाच्या दूध उत्पादक कंपनीचे दूध चंद्रपूर येथून आणले जात होते. मात्र दूध संघामार्फत वेळेवर दुधाचा पुरवठा केला जात नव्हता. त्याचबरोबर दुधाचा दर्जा चांगला नसल्याच्या तक्रारी वाढल्याने दूध खरेदी करण्यास ग्राहक तयार होत नव्हते. त्यामुळे गडचिरोली येथील मुख्य विक्रेत्याने दुधाची खरेदी बंद केली. परिणामी मागील दीड वर्षांपासून आरेच्या दुधाचा पुरवठा बंद झाला आहे.
दुग्ध व्यवसायाला घरघर
By admin | Published: June 21, 2017 1:25 AM