नेलगुंडा परिसरातील २५ गावांना रूग्णवाहिकेचा लाभ नाहीरमेश मारगोनवार भामरागडराज्यपालांनी दत्तक घेतलेल्या महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात रस्ते निर्मितीकडे राज्य व केंद्र सरकारचे दुर्लक्ष झाल्याने या तालुक्यात आरोग्य विभागाला देण्यात आलेल्या १०८ रूग्णवाहिकेचा उपयोग होतच नाही, असे चित्र आहे. त्यामुळे अनेक दुर्गम गावातून आजही खाद्यांवर व खाटेवर रूग्ण दवाखान्यापर्यंत आणले जातात. भामरागड तालुका मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर असलेला नेलगुंडा परिसर हा पामुलगौतम नदीच्या पलिकडे आहे. नदी ओलांडल्यानंतर धोडराज फाट्यापासून एक भाग लाहेरी व दुसरा भाग नेलगुंडा. या परिसरात गोंगवाडा, परयनार, इतलवाडा, बुसेवाडा, बोडंगे, गोटपाडी, पेनगुडा, इरपनार, कुचेर, दरबा, जुव्वी, गोलगुडा, जारेगुडा, भटपार, कवंडे आदी २५ गावांचा समावेश आहे. या मार्गावर मोठे नाले असल्याने पावसाळ्यात दळणवळणाच्या साधनाचा अभाव आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी भामरागडला येण्याकरिता रूग्णांना खाटेवर बांधून आणल्याशिवाय पर्याय नाही. शासनाकडून १०८ टोल फ्री रूग्णवाहिका वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र भामरागडपासून अहेरी उपजिल्हा रूग्णालय किंवा गडचिरोली रूग्णालयापर्यंत या वाहनाची सुविधा उपलब्ध होत आहे. तालुक्याच्या दुर्गम भागामध्ये रस्त्याअभावी रूग्णांना १०८ टोल फ्री रूग्णवाहिकेचा उपयोग होत नाही. बाळंत महिलेलाही सोसाव्या लागते यातनाअनेकदा बाळंतपणाच्या गंभीर महिलेला ग्रामीण रूग्णालयात पामुलगौतम नदी ओलांडून खाटेवर आणावे लागते. येथे डॉक्टर नसले तर हेमलकसाच्या रूग्णालयात न्यावे लागते. नेलगुंडा परिसरातील लोकांसाठी हा अनुभव आता नवा राहिलेला नाही. डॉक्टरांच्या रिक्त पदामुळे शवविच्छेदनासाठी जावे लागते अहेरीभामरागड येथे ग्रामीण रूग्णालय आहे. परंतु या ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पद रिक्त आहे. कधीकधी वेळेवर एकच डॉक्टर उपस्थित राहतात. ते सुटीवर गेले तर जिवंत असलेल्या रूग्णावरही उपचार न झाल्याने मरणाची पाळी येते तर अनेकदा शवविच्छेदनासाठी नातलगांना शव घेऊन अहेरी उपजिल्हा रूग्णालय गाठावे लागते.
रस्त्याअभावी १०८ रूग्णवाहिकेचे चाक थांबलेलेच
By admin | Published: August 09, 2015 1:28 AM