हेलिकॉप्टर ढगात शिरलं, तेव्हा पोटात गोळा आला पण फडणवीस म्हणाले, काळजी करू नका...अजित पवारांनी सांगितला प्रवासातील किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 07:47 AM2024-07-18T07:47:59+5:302024-07-18T07:48:14+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेल्या या किश्श्याने भर सभेत खसखस पिकली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हेही खळखळून हसले.
गडचिरोली : गडचिरोलीला हेलिकॉप्टरने जाताना नागपूरपर्यंत ठीक वाटले, पण नंतर हेलिकॉप्टर ढगात शिरले, इकडं पाहतोय ढग, तिकडं पाहतोय ढग, जमीन दिसेना, झाडंही दिसेना... पोटात गोळा आला, आज आषाढी एकादशी... पांडुरंगा, पांडुरंगा असे नाव घेत होतो, पण देवेंद्र फडणवीस हे काळजी करू नका... असे उपदेश देत निश्चिंत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेल्या या किश्श्याने भर सभेत खसखस पिकली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हेही खळखळून हसले.
त्याचे झाले असे, १७ जुलैला सकाळी साडेअकरा वाजता उपमुख्यमंत्री द्वयींचा नियोजित गडचिरोली दौरा होता. अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रा. लि. कंपनीच्या दहा हजार कोटी गुंतवणुकीच्या स्टील निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, पार्थ पवार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उदय सामंत व पार्थ पवार हे नागपूरहून गडचिरोलीला हेलिकॉप्टरने निघाले, पण सकाळपासूनच गडचिरोलीत ढग दाटून आले होते. खराब वातावरणामुळे फडणवीस व पवार हे कार्यक्रमास येतील की नाही, अशी काळजी वाटत होती, असे मंत्री आत्राम यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी हेलिकॉप्टर प्रवासातील किस्सा सांगितला.
‘ढगात चाललोय की आणखी कुठं’
हेलिकॉप्टर ढगात शिरल्यावर बाहेर काहीच दिसत नव्हते. फडणवीस मात्र निवांत गप्पा मारत बसले होते. मी त्यांना म्हणालो, अहो, बाहेर काहीच दिसत नाही, आपण ढगात चाललोय की आणखी कुठं चाललोय काही कळेना. त्यावर ते म्हणाले, माझे सात अपघात झाले आहेत, मात्र माझ्या नखालाही धक्का लागलेला नाही, तुम्हालाही काही होणार नाही, काळजी करू नका... यावर भर सभेत हशा पिकला, तर फडणवीस यांनाही हसू आवरले नाही.
नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात गडचिरोलीतूनच
nवर्षभरापूर्वी अजित पवार यांनी काका शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत सहभागी होत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नवा राजकीय पट मांडला होता.
nसत्तानाट्यानंतर शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे गडचिरोलीत पहिल्यांदाच एकत्रित आले होते. जाहीर सभेला संबोधित करत त्यांनी नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.
nगडचिरोली दौऱ्यातील हेलिकॉप्टर प्रवासातील गमतीदार किस्सा सांगून अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत तूर्त राजकीय सुरक्षित प्रवास सुरू असल्याचे संकेत दिल्याची चर्चा होत आहे.