चामाेर्शी : चामाेर्शी हा गडचिराेली जिल्ह्यात सर्वांत माेठा तालुका आहे. मात्र, अग्निशामक दल नसल्याने येथे अनेक समस्या निर्माण हाेत आहेत. धानपिकाचे माेठे क्षेत्र असून, धान पुंजण्याला आग लागण्याच्या घटना बऱ्याच घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. तालुका निर्मिती हाेऊन ४० वर्षे उलटली तरी तालुका मुख्यालयी अग्निशामक दल नाही.
चामाेर्शी येथे वनविकास महामंडळ, राईसमिल, कृषी उत्पन्न बाजार समिती, आदिवासी महामंडळाचे अनेक माेठे गाेदाम आहेत. तालुक्यातील हजाराे टन धान्य रेशनच्या गाेदामात साठविले जाते. शाळा, महाविद्यालये, बँका, महत्त्वाची सर्व कार्यालये येथे आहेत. परंतु, आगीची घटना घडल्यास तालुक्याच्या बाहेरून अग्निशामक दलाची गाडी बाहेरून मागवावी लागते.
मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीला माेठी यात्रा असते. येथे अहेरी नगरपंचायतीची अग्निशामक गाडी उभी ठेवली जाते. इतर वेळेस आगीची घटना घडताच गडचिराेली नगरपरिषदेची गाडी बाेलावली जाते. गाडी पाेहाेचेपर्यंत बरेच नुकसान हाेऊन जाते.
चामाेर्शी नगरपंचायत हाेऊन पाच वर्षे पूर्ण झाली. अग्निशामक दल गाडीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याचे नगर प्रशासनाकडून सांगितले जाते. परंतु, दिरंगाई कुणाकडून हाेत आहे, हे समजत नाही. नगरपंचायत प्रशासनाचा पाठपुरावा की लाेकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, हे कळायला मार्ग नाही.