पर्लकोटा नदीवरील ठेंगणा पूल : दरवर्षीच तालुकावासीयांना करावा लागतो पुराचा सामनालोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : पर्लकोटा नदीच्या ठेंगण्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडसह तालुक्यातील सुमारे १२८ गावांचा जगाशी संपर्क तुटतो. पावसाळ्यात किमान २० दिवस ही गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहतात. ही व्यथा आणखी किती दिवस सोसावी लागणार, असा प्रश्न तालुक्यातील जनता उपस्थित करीत आहे. भामरागड तालुक्यात एकूण १२८ गावे आहेत. या तालुक्यात पुलाच्या मार्गाने प्रवेश करायचा म्हटला तर भामरागडजवळील पर्लकोटा नदीचे पूल ओलांडावेच लागते. मात्र या पुलाची उंची अतिशय कमी आहे. गडचिरोली जिल्ह्यात पाऊस झाल्यास पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी वाढते व सदर पूल बुडतो. एवढेच नाही तर छत्तीसगड राज्यात पाऊस झाल्यास याचाही फटका भामरागड तालुक्यातील जनतेला बसतो. इंद्रावती नदी छत्तीसगड व महाराष्ट्राचे विभाजन करणारी नदी आहे. इंद्रावतीला पूर आल्यास पर्लकोटाला दाब निर्माण होते. पामुलगौतम नदीच्याही पाण्यामुळे पर्लकोटावरील ठेंगणा पूल पाण्याने वेढते. एकंदरीतच पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या तीन नद्यांचा फटका भामरागड तालुक्याला बसतो. पर्लकोटा नदीवरील पुलाला भामरागड तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाते. मात्र हे प्रवेशद्वार अतिशय ठेंगणे आहे. या पुलाची उंची वाढविण्याचे आश्वासन आजपर्यंतच्या अनेक लोकप्रतिनिधींनी दिले आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरूवातच झाली नाही. अहेरी विधानसभा क्षेत्राला मंत्री पद मिळाले. त्यामुळे पर्लकोटावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात आता दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी पूल मंजूर होण्याच्या हालचाली सुध्दा सुरू झाल्या नाहीत. सिरोंचाजवळील गोदावरी नदीवरील पूल, प्राणहिता नदीवरील अहेरी तालुक्यातील गुडेमजवळील पुलांची मागणी पर्लकोटाच्या पुलाच्या नंतरची मागणी आहे. मात्र तेलंगणा राज्यातील आमदारांनी या दोन्ही पुलांकडे लक्ष दिल्याने प्राणहिता नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. तर गोदावरी नदीवरील पूल पूर्णत्वास आले आहे. सिरोंचा तालुक्यातील इंद्रावती नदीवरील पुलाचेही भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले. जिल्ह्याच्या सभोवताल पुलांचे बांधकाम होत असताना पर्लकोटा वरील पूल मात्र दुर्लक्षितच राहिला आहे.
भामरागडातील १२८ गावांची व्यथा कधी संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:25 AM