लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : ग्रामीण व शहरी भागाची आरोग्य यंत्रणा काहीशी बळकट झाली असली तरी येथे अनेक आरोग्य सुविधांचा अभाव आहे. विशेष म्हणजे येथील सामान्य रुग्णालयात एमआरआय मशीनचा अभाव आहे. परिणामी, येथील रुग्णांना एमआरआय मशीनच्या साहाय्याने विविध रोगांचे निदान करून घेण्यासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागते. यापोटी त्यांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यात एमआरआयची सुविधा कधी होणार, असा प्रश्न रुग्णांनी उपस्थित केला आहे.
कर्करोग, हृदयरोग, स्नायू आणि हाडांच्या विकृती तसेच नस दबणे, लकवा, वातरोग, मेंदूचे विकार, पाठीचा कणा, मणका व तत्सम रोगाच्या निदानासाठी एमआरआय मशीनने तपासणी करावी लागते. तेव्हाच परिपूर्ण निदान होते. त्यानंतर डॉक्टरांकडून औषधोपचार करता येतात.
गडचिरोली जिल्ह्यात दोन जिल्हा रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय आहेत. मात्र, या एकाही रुग्णालयात एमआरआय मशीनचा अभाव आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना चंद्रपूर, ब्रह्मपुरी तसेच नागपूरला जावे लागते. यासाठी बराच पेसा व वेळ खर्च होतो. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एमआरआय मशीन शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र, ही मागणी अजूनही पूर्ण झाली नाही. आरोग्याच्या या गंभीर बाबीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या पाच वर्षांत गडचिरोली, आरमोरी, देसाईगंजसह सर्व तालुका मुख्यालयाची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पाठ व मानदुखी व मणक्याचा त्रास वाढला आहे. परिणामी, अशा रुग्णांना एमआरआय मशीनने तपासणी करणे आवश्यक ठरते. मात्र, जिल्ह्यात कोणत्याच रुग्णालयात एमआरआय मशीनची सुविधा नसल्याने रुग्णांना जिल्ह्याबाहेर जावे लागत आहे.
किती येतो रुग्णाला एमआरआयसाठी खर्च? एमआरआय करण्यासाठी रुग्णांना पाच हजारांपासून १० ते १२ हजार रुपयापर्यंत खर्च येतो. शरीराच्या कोणत्या व किती भागाचे एमआरआय करायचे आहे, यावर संबंधित खाजगी रुग्णालयाच्या वतीने शुल्क आकारले जाते. जाण्यायेण्याचा खर्च वेगळा येतो. एमआरआय करण्यासाठी जिल्हयातील नागरिकांना नागपूर, चंद्रपूर व ब्रम्हपुरीला जावे लागते.
"गडचिरोली जिल्ह्यात गरीब कुटूंबांची संख्या मोठी आहे. अशा कुटूंबातील पाठदुखी, मणक्याचे आजार व तत्सम रोगासाठी मोठया शहरात जावून महागडी एमआरआय सुविधा मिळवू शकत नाही. त्यामुळे राज्य शासनाने जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयात एमआरआय मशिन व तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे." - तुळशीराम सहारे, सामाजिक कार्यकर्ते