प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक असावे असे शासनाचेच धोरण आहे. जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या देसाईगंज येथील बसस्थानकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नझुल खसरा क्रमांक २४-५ मधील खुल्या खंडकापैकी ६१२० चौ. मी. जमिनीची अनुज्ञेय रक्कम १ कोटी २४ लाख २३ हजार रुपये दि. ३ नोव्हेंबर २०१८ अन्वये शासन जमा करण्यात आली.
या कालावधीस आजमितीस दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही कुठल्याच हालचाली करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. प्रलंबित असलेल्या बसस्थानकाचा प्रश्न दि. ८ मार्च २०२१ रोजी राज्याच्या विधिमंडळात अर्थसंकल्प सुरू असताना तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात आमदार गजबे यांनी उपस्थित केला हाेता. परिवहनमंत्री अनिल परब यांनी कोरोना संकटामुळे बांधकाम सुरू होऊ शकले नाही, असे मान्य करीत सदर कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिल्याने बसस्थानक बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात होते; परंतु आजतागायत मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. मंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.