लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : साधारणत: इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी दहावीपर्यंत नक्कीच पाेहाेचताे. सन २०१९-२० मध्ये सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाचे मिळून जवळपास १६ हजार विद्यार्थी इयत्ता नववी उत्तीर्ण हाेऊन दहावीत गेले. त्यापैकी दहावीच्या परीक्षेला १४ हजार ८०० विद्यार्थी नाेंदणीकृत झाले. उर्वरित १२०० विद्यार्थी गेले कुठे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १० माध्यमिक शाळा आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या ८०० वर शाळा आहेत. काेराेना संकटाच्या महामारीमुळे सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रामध्ये मार्च महिन्यापासून विद्यार्थ्यांसाठी कुलूपबंद झाल्या. त्यावेळी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील जवळपास १६ हजार विद्यार्थी इयत्ता नववी उत्तीर्ण झाले. हे सर्व विद्यार्थी दहावीत गेले. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये दीपावलीनंतर या विद्यार्थ्यांकडून बाेर्डाच्या परीक्षेचा अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाली. अंतिम मुदतीपर्यंत जिल्हाभरात १४ हजार ८०० विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करून नाेंदणी केली. दहावीतील प्रवेशीत विद्यार्थी व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी संख्येमध्ये जिल्ह्यात तफावत दिसून येत आहे.
काेट
काेराेना संकटाच्या महामारीमुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातील इयत्ता दहावीचे काही विद्यार्थी शाळेच्या संपर्कापासून दूर गेले. शाळांनी सूचना दिली असली तरी काही विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा फार्म भरला नाही. लाॅकडाऊन काळात शाळा बंद असल्याने अनेकांनी मध्ये शाळा साेडली असावी. त्यामुळे या सर्व कारणामुळे इयत्ता नववी उत्तीर्ण व दहावीच्या परीक्षेसाठी नाेंदणीकृत झालेल्या विद्यार्थी संख्येमध्ये तफावत दिसून येत आहे.
- रमेश उचे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, जि.प. गडचिराेली
स्थलांतर व आर्थिक अडचणीचे कारण
पूर्वीप्रमाणे आजही काही विद्यार्थी मध्येच शाळा साेडतात. याला विविध बाबी व कारणे आहेत. काैटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाखीची असणे, आर्थिक चणचण भासल्यामुळे काही विद्यार्थी शाळेला रामराम ठाेकतात. छाेटे-माेठे काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी विद्यार्थी तयार हाेत असल्याने शाळेकडे दुर्लक्ष हाेते. याशिवाय कुटुंबातील सदस्य राेजगारासाठी भटकंती व स्थलांतर करतात. अशा कुटुंबातील विद्यार्थी मधेच शाळा साेडतात.
पटसंख्येचा घाेळ?
- इयत्ता नववीपर्यंत काेणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण केले जात नाही. त्यामुळे इयत्ता पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी मधे शाळाबाह्य झाला तरी पटसंख्येसाठी त्याला शाळाबाह्य दाखविले जात नाही.
- दुर्गम, अतिदुर्गम भागातील काही शाळांमध्ये पटावर विद्यार्थ्यांची नाेंदणी असते. मात्र, काही विद्यार्थी वर्षभर शाळेत जात नाहीत. पूर्वी विद्यार्थी पटसंख्येचा घाेळ अनेक ठिकाणी दिसून यायचा. मात्र, आता ऑनलाईन प्रक्रिया झाल्यामुळे व युडायस, तसेच शासनाच्या विविध साॅफ्टवेअरमध्ये विद्यार्थी संख्येचा डेटा अपलाेड केला जात असल्याने विद्यार्थी पटसंख्येमध्ये पारदर्शकता आली आहे.
जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी १६०००
दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी १४८००