दिलीप दहेलकर, गडचिराेली : धान उत्पादक जिल्हा म्हणून गडचिराेली जिल्ह्याची ओळख आहे. नव्हे या जिल्ह्याची अर्थव्यवस्थाच शेती व्यवसायावर अवलंबून आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात धान व इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. दरम्यान, आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनची धान केंद्रे धानाने लवकरच फुल्ल हाेतात. मात्र यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्यात याउलट चित्र आहे. महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान व मक्याची मुळीच आवक झाली नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यात रबीचा धान अन् मका गेला कुठे? असा प्रश्न यंत्रणेसमाेर निर्माण झाला आहे.
आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने खरीप हंगामात जानेवारी ते मार्च या कालावधीत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले जाते. या केंद्रांवर काेट्यवधी रूपयांची धानाची खरेदी केली जाते. सरकारची एजंसी म्हणून या दाेन्ही संस्था धान खरेदीच्या व्यवहाराचे काम करतात. मात्र रबी हंगामात काेणत्याच शेतमालाची खरेदीचा व्यवहार हाेत नसल्याने या यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी खरीप हंगामाचाच हिशेब सांभाळण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते.
रबी हंगामात धानाला प्रति क्विंटल २ हजार १८३ असा भाव आहे. तर मक्याला प्रति क्विंटल २ हजार ९० रूपये क्विंटल असा भाव आहे. यापेक्षा खासगी व्यापाऱ्यांकडे अधिक भाव मिळत असल्याने आणि झटपट चुकारे हाेत असल्याने यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रांकडे पाठ फरविल्याचे दिसून येते.
मका विक्रीसाठी नाेंदणीच नाही
अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने रबी हंगामात धान व मका खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनला परवानगी देण्यात आली. दरम्यान या दाेन्ही मालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना पाेर्टलवर ऑनलाइन नाेंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले हाेते. २८ मार्च ते ३१ मे व आत्तापर्यंत मका विक्रीसाठी जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याने नाेंदणी केली नसल्याची माहिती आहे.
केवळ १२८ शेतकऱ्यांची धानासाठी नाेंदणी
रबी हंगामात जिल्हयात धान विक्रीसाठी जिल्हयातील अत्यल्प शेतकऱ्यांनी ऑलाईल पाेर्टलवर नाेंदणी केली. २८ मार्चपासून आतापर्यंत जिल्हयातील केवळ १२८ शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नाेंदणी केली असल्याची माहीती आहे.
कुठे हाेते उन्हाळी धान, मक्याचे उत्पादन
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा आहेत, असे शेतकरी आपल्या शेतात रबी हंगामात उन्हाळी धान व मका पिकाची लागवड करतात. जिल्हयात आरमाेरी, देसाईगंज, कुरखेडा, सिराेंचा या चार तालुक्यात भरपूर प्रमाणात उन्हाळीधन पिकाचे उत्पादन घेतले जाते. चामाेर्शी व अहेरी तालुक्याच्या काही भागात उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले जाते. मुलचेरा, कुरखेडा, आरमाेरी व सिराेंचा या चार तालुक्यात रबी हंगामात मक्याचे उत्पादन घेतले जाते. यंदाही या तालुक्यात धान व मक्याचे उत्पादन घेतले. मात्र आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर मुळीच आवक झाली नाही.
नाेंदणीसाठी पुन्हा ३० जूनपर्यंत मुदतवाढ
रब्बी हंगामातील धानाची विक्री आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रांवर करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत ३१ मे पर्यंत होती. मात्र, मागील हंगामाच्या तुलनेत यंदा अजुनही अपेक्षेप्रमाणे ऑनलाईन नोंदणी झालेली नसल्याने शासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. आता ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून ३१ जूनपर्यंत करण्यात आली आहे.
असे आहेत जिल्हयात आधारभूत केंद्रधानासाठी : ३६मक्यासाठी : १०