लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : पावसाळा आणि किडे हे जणू समीकरणच आहे. त्यामुळे पावसाळ्यात किड्यांचा उपद्रव वाढतो. दिवा लावला की त्याखाली हे कीटक मोठ्या प्रमाणात जमा होतात, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
दरवेळी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांची आणि किड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अगदी घरात असो किंवा बस, दुकान, ऑफिसमध्ये तुम्हाला एखादा कीडा तुम्हाला चाऊ शकतो. अशावेळी हे किडे चावण्याचाही संभव असतो. कीडा चावल्यास शरीराला मोठा त्रास होतो. त्वचेला खाज सुटणे, त्वचा लालसर होणे, काही प्रमाणात सूज येणे असे प्रकार संभवतात. काही किडे हे विषारी असतात तर काही अविषारी. कोणत्याही प्रकारचा कीडा चावल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा; पण तोपर्यंत किडे चावल्यास तुम्ही घरगुती उपायही करू शकता.
पावसाळी किड्यांना घरापासून असे ठेवा दूर
१) या पावसाळी किड्यांना घरात येण्यापासून सर्वांत प्रभावी उपाय म्हणजे सायंकाळी घराच्या सर्व खिडक्या व दारे बंद करून घेणे, खिडक्या आणि दारांमध्ये जी जागा रिकामी आहे त्यामध्ये भेगा भरणे आवश्यक आहे. अन्यथा येथूनही किडे येऊ शकतात.
२) खोलीत प्रकाशाची गरज नसलेल्या ठिकाणी दिवे किवा लाईट्स बंद करा, विशेषतः छताच्या आणि खिडक्यांभोवतीचे दिवे बंद करा.
बर्फाचा शेक :कीडा चावल्यास त्वचा लालसर होते. काही प्रसंगात त्वचेला सूजही येते. अशा वेळी कीडा चावल्याच्या ठिकाणी बर्फ ठेवा. बर्फाचा शेक घेतल्याने आराम मिळतो. तसेज, सूज कमी यायलाही मदत होते.
मधही फायदेशीर :कीडा चावल्यावर होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळवायचा असेल तर मध फायदेशीर ठरते. कीडा चावलेल्या जागेवर मध चोळा. मधातील औषधी गुणधर्म वेदना दूर करतो.
"किड्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ते उपाय करावेत. लहान मुले, वृद्धांना जपावे, कोणत्याही प्रकारचा कीडा चावल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा."- डॉ. संजय कन्नमवार, आरमोरी