विदर्भवाद्यांचा सवाल : ११ जानेवारीला जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन; मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ गडचिरोली : महाराष्ट्र राज्यावर सुमारे ४ लाख १९ कोटी रूपयांचे कर्ज आहे. या कर्जाच्या व्याजाचे हप्ते फेडताना राज्य शासनाची कंबर तुटत आहे. अशा स्थितीत गडचिरोली जिल्ह्यासाठी आपण तिजोरी रिकामी करू, असे पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तिजोरीत पैसाच नाही तर देणार कुठून, असा सवाल उपस्थित करत कर्ज काढून केलेला विकास कामाचा नाही. कर्जबाजारी महाराष्ट्र शासन विदर्भाचा अनुशेष भरून काढणे कधीच शक्य नाही. त्यामुळे विदर्भाच्या विकासाचीही अपेक्षा करणे चुकीचे आहे. विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य नियंत्रक राम नेवले यांनी दिली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलन करण्यात आले. मात्र शासनाने अजुनपर्यंत विदर्भ दिला नाही. त्यामुळे ११ जानेवारी रोजी विदर्भातील ८० ठिकाणी चक्काजाम व रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, आष्टी, येनापूर, चामोर्शी, गडचिरोली, आरमोरी, कोंढाळी, देसाईगंज, कुरखेडा, पुराडा या ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात बहुसंख्य युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. विदर्भातील नोकऱ्या पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील युवकांनी बळकावल्या आहेत. विदर्भातील युवकाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. मात्र विदर्भात पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील अधिकाऱ्यांची फौज पाठविली जात आहे. वेगळा विदर्भ झाल्यास सध्या कार्यरत असलेली अधिकाऱ्यांची फौज विदर्भातून चालती होईल. रिक्त पदांवर येथील युवकांना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी मिळेल. त्यामुळे युवकांनी स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यात स्वत:ला झोकून द्यावे, असे आवाहन नेवले यांनी केले. पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, अरूण मुनघाटे, रमेश भुरसे, पं.स. सदस्य अमिता मडावी, समय्या पसुला, एजाज शेख, प्रतीभा चौधरी, चंद्रशेखर भडांगे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
कर्जबाजारी राज्य शासन कुठून देणार गडचिरोलीसाठी निधी?
By admin | Published: January 04, 2017 1:20 AM