या सेंटर्समध्ये सध्या दाखल असलेले रुग्ण- ४४८
गडचिरोली : जिल्ह्यातील तालुका मुख्यालयी असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या बरीच आहे. ज्यांना कोरोनाची तीव्र लक्षणे नाहीत, अशांना या सेंटरमध्येच उपचारासाठी ठेवले जाते. या ठिकाणच्या वैद्यकीय उपचारांबाबत कोणाच्या फारशा तक्रारी नसल्या तरी तिथे मिळणाऱ्या जेवण किंवा नाष्ट्याबाबत अनेकजण समाधानी नाहीत.
जिल्ह्यात सध्या ११ ठिकाणी असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ४४८ रुग्ण दाखल आहेत. १५ दिवसांपूर्वी ही संख्या आता आहे त्यापेक्षा दुप्पट होती. या दरम्यान जेवण किंवा नाष्ट्याच्या बाबतीत हेळसांड झाल्याचा अनुभव अनेक रुग्णांनी सांगितला. काहींना भाजीत तेल-मसाला कमी असल्याने ती बेचव वाटली; तर काहींनी वरण म्हणजे नुसतेच डाळीचे पाणी असल्याची कुरबूर केली. काहींनी नाष्ट्याला चवच नसल्याचे सांगितले; तर फळे, अंडी मिळतच नव्हती, असाही अनुभव काहींनी व्यक्त केला.
(बॉक्स)
धानोरा केंद्रात सर्वाधिक चांगले जेवण
येथील केंद्रात नाष्टा, दूध, अंडी, फळे, चहा नियमित मिळतो. यासोबतच जेवणाचा दर्जाही उत्तम असून रुग्णांची काळजीही चांगली घेतली जाते, असा अनुभव कोरोनामुक्त झालेले शिवसेनेचे धानोरा शहरप्रमुख मुकुल बोडगेवार यांनी सांगितला. यावरून जिल्ह्यातील इतर केंद्रांच्या तुलनेत या केंद्रावरील जेवणाचा दर्जा आणि इतर सेवा चांगल्या असल्याचे दिसते.
एटापल्ली कोविड सेंटर
येथील कोविड केअर सेंटरमध्ये भाज्यांना तेलच नसते; त्यामुळे भाजी चवदार लागत नाही, अशी रुग्णांची तक्रार आहे. वरण पातळ असते. याशिवाय कांदे, टाेमॅटो यासारखे सलाद मिळत नाही. पोळ्या भाजलेल्या नसतात, अशी व्यापारी वर्गाची तक्रार आहे.
अहेरी कोविड सेंटर
एकलव्य निवासी शाळेतील कोविड सेंटरमध्ये जेवण, नाष्टा, चहा सर्वकाही चांगले मिळते; पण अंडी, केळी व इतर फळे मात्र मिळत नाहीत, अशी तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.
आरमोरी कोविड सेंटर
शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील कोविड सेंटरमधील जेवण, नाष्ट्याचा दर्जा मध्यम स्वरूपाचा आहे. त्यामुळे जेवणाविषयी कोणाला फारशा तक्रारी नाही; पण रुग्णाला गरम पाणी न देता थंड पाणी पिण्यास दिले जाते, अशी काही लोकांची तक्रार आहे.