अहेरी (गडचिरोली) : मागील काही दिवसांपासून अहेरी नगरपंचायत प्रशासनातर्फे अहेरी शहरातील रस्त्याच्या नालीवरील व रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढणे सुरू आहे. मात्र, या मोहिमेत श्रीमंत आणि गरिबांबाबत दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
बसस्थानक रस्त्यावर कोणतीच नाली नसतानाही गॅरेज, चायनीज, फळवाले आपल्या टपरीसमोर शेड टाकून आपले दुकान चालवत होते. काही दुकानदार शुक्रवार असल्याने दुकान बंद करून बाहेर गावी गेले होते. नगरपंचायत प्रशासनाने जेसीबी लावून नालीवर असलेली दुकाने हटविली. त्यामुळे गरीब दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मोठ्या दुकानदारांना झुकते माप देत त्यांना सोमवारपर्यंतचा वेळ दिल्याने त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे.
नगरपंचायतने अतिक्रमित दुकानदारांना नोटीस पाठवून तीन दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्यास सांगितले होते. मात्र, काहीं व्यापाऱ्यांना तीन दिवस मुदतवाढ करून दिल्या गेली. मात्र, टपरी व शेड टाकून उपजीविका निभावत असलेल्या लहान दुकानदार यांना अतिक्रमण काढण्यास वेळ दिला नाही. जेसीबी लावून शेड काढले. शेड पूर्णपणे तुटले आहे. श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आम्ही आधीच अतिक्रमणधारकांना नोटीस पाठविली होती. अनेकांनी स्वतःहून अतिक्रमण काढले तर काही व्यापारी वर्गाने भेट घेऊन मुदतवाढ करण्याची विनंती केली. त्यामुळे रविवारपर्यंत वेळ दिली होती. काहींना आम्ही संपर्क केला मात्र संपर्क झाला नव्हता. त्यामुळे नाईलाजास्तव जेसीबीने टिनाचे शेड काढले. त्यात त्यांचे नुकसान झाले.
- एन.सी. दाते, प्रभारी मुख्याधिकारी, अहेरी नगरपंचायत.