गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील तलाठी आशा नानाजी चिचघरे व कोतवाल धनराज सुरेश भोयर या दोघांना एका शेतकऱ्याकडून ४ हजार ५०० रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ मे रोजी रंगेहात पकडून त्यांना अटक केली आहे. या दोघांनाही मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.अनखोडा साजा अंतर्गत येणाऱ्या चंदनखेडी येथील शेतकऱ्याने सर्वे क्र. ७/३३, ३६/३, ७/३३, ३६/२ मधील ०.४९ हेक्टर आर जमीन त्याच्या मुलीच्या नावाने बक्षीस पत्रावर विक्री करून दिली आहे. या शेतजमिनीचा फेरफार घेऊन तक्रारदाराच्या मुलीचे नाव शासकीय अभिलेखावर नोंद करून नवीन सातबाराचा उतारा तयार करून देण्याच्या कामाकरिता अनखोडाचे तलाठी आशा नानाजी चिचघरे हिने ४ हजार ५०० रूपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय गडचिरोली यांच्याकडे केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तलाठी आशा चिचघरे हिने कार्यालयातील सहकारी कोतवाल धनराज भोयर याच्या हस्ते लाच स्वीकारली. लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठी चिचघरे व कोतवाल धनराज भोयर या दोघांनाही अटक केली. त्यांच्या विरोधात चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये कलम ७, १२, १३ (१), (ड) सह १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला व अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला. सदर कारवाई पोलीस उपायुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस अधीक्षक राकेश शर्मा, पोलीस उपअधीक्षक किशोर सुपारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक डी. डब्ल्यू. मंडलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलीस हवालदार विठोबा साखरे, नापोशी सतीश कत्तीवार, पोलीस शिपाई मिलिंद गेडाम, महेश कुकुडकर, गणेश वासेकर, सोनल आत्राम, घनश्याम वडेट्टीवार यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)
लाच घेताना तलाठी व कोतवालास अटक
By admin | Published: May 11, 2016 1:31 AM