कुरखेडा : प्रशासनाच्या वतीने कुरखेडा तालुक्यात चारभट्टी, खेडेगाव, कुंभीटोला, शिवणी, चांदागड व सोनसरी येथे सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे या पाणी योजनांच्या देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून सदर सहा ठिकाणच्या पाणी योजना बंद पडल्या आहेत.
सौरऊर्जेवरील या लघु पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने चारभट्टी, खेडेगाव, कुंभीटोला, शिवणी, चांदागड व सोनसरी या सहा गावात उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. सौरऊर्जेवरील पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध असूनही दुरूस्तीच्या कामाकडे ग्रामपंचायती दुर्लक्ष करीत आहेत. सौरऊर्जा पाणीपुरवठा योजनेच्या वापराचा ग्रामपंचायतीला कोणताही अतिरिक्त खर्च नाही. केवळ देखभाल व दुरूस्तीचा खर्च करावा लागते. एवढा खर्च ग्रामपंचायतीला करणे सहज शक्य आहे. मात्र ग्रामपंचायत याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. परिणामी मागील अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा योजना बंद आहेत.