मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली हा दारूबंदी असलेला महाराष्ट्रातील दुसरा जिल्हा. या जिल्ह्यात १९९३ पासून ‘दारूबंदी’ लागू करण्यात आली असली तरी इतक्या वर्षात हा जिल्हा खऱ्या अर्थाने ‘दारूमुक्त’ मात्र नव्हता. पण आता खरोखरच हा जिल्हा दारूमुक्त व्हावा म्हणून गावोगावच्या महिला पुढे सरसावल्या आहेत. मुक्तिपथ अभियानाने त्यांना दिशा दिली, आत्मविश्वास दिला आणि आता प्रत्यक्ष कृतीही सुरू झाली आहे. २६ वर्षानंतर खऱ्या अर्थाने आता या जिल्ह्याची दारूमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.आदिवासीबहुल आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक गाळली आणि घेतली जाते ती मोहाची गावठी दारू. ही हातभट्टीची दारू गाळली जात नाही असे गाव या जिल्ह्यात शोधूनही सापडणार नाही. त्याचे कारणही तसेच आहे. आदिवासी लोकांना धार्मिक कार्यासाठी दारू लागते, बडा देवाला दारू वाहण्याची श्रद्धा आहे. केवळ याच कारणातून या जिल्ह्यात दारूबंदी असतानाही प्रत्येक आदिवासी कुटुंबाला ५ लिटरपर्यंत हातभट्टीची दारू गाळण्याची (बाळगण्याची) अलिखित परवानगी दिलेली आहे. पण याचा गैरफायदा घेत अनेक लोकांनी गावठी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. रोजगाराची इतर साधने नसल्यामुळे मिळकतीचा हा मार्ग अनेकांना सोपा वाटला आणि त्यातून दारू विक्री वाढत गेली. बहुतांश भाग जंगलाचा असल्यामुळे मुबलक प्रमाणात सहज उपलब्ध होणारे मोहफूल, दारू गाळण्याच्या व्यवसायाला चालना देणारे ठरले. त्यातच मोहफुलातील गुणकारी घटकांमुळे गैरआदिवासी नागरिकांनाही त्याचे आकर्षण वाटू लागले. एवढेच नाही तर अनेक शहरी लोक दारूबंदीमुळे अतिरिक्त पैसे देऊन घ्याव्या लागणाऱ्या विदेशी दारूऐवजी कमी पैशात मिळणाऱ्या या मोहफुलाच्या दारूला पसंती देऊ लागले. यातूनच शहरालगतची काही गावं अक्षरश: गावठी दारूचे अड्डे बनले.‘शोधग्राम’मधील माँ दंतेश्वरी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण रुग्णांमध्ये दारू आणि तंबाखूच्या सेवनामुळे झालेल्या दुष्परिणामांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत होती. या रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासोबतच भविष्यातील धोका टाळण्यासाठी त्यांना व्यसनांपासून दूर नेणे गरजेचे आहे, ही बाब ‘सर्च’चे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय व डॉ.राणी बंग यांच्या लक्षात आली. त्यांनी या विषयाचे गांभिर्य शासनाच्या निदर्शनास आणून दिले. शासनानेही तेवढ्याच गांभिर्याने हा विषय हाताळत गडचिरोली जिल्ह्याला दारू आणि तंबाखूच्या व्यसनांपासून मुक्त करण्याची धुरा डॉ.बंग यांच्या खांद्यावर दिली आणि ‘मुक्तिपथ अभियाना’ला सुरूवात झाली.गेल्या तीन वर्षात या अभियानातून सुरू झालेला व्यसनमुक्तिचा लढा पूर्णपणे यशस्वी झालेला नसला तरी त्याला बरेच मोठे यश आले आहे. गावागावात झालेल्या जनजागृतीमधून आज ६०० गावांनी गावात दारूविक्री न करण्याचा घेतलेला ठराव हा या अभियानाचाच परिणाम आहे. आता तर शाळकरी मुलेही अप्रत्यक्षपणे या अभियानाचा भाग झाले आहेत. व्यसन करणार नाही आणि करू देणार नाही, अशी शपथ त्यांना मुक्तिपथच्या कार्यकर्त्यांनी दिली. त्यामुळे भविष्यात घराच्या चार भिंतीआड लपून ठेवलेली दारूही हद्दपार होण्याची सकारात्मक चिन्हं दिसू लागली आहेत.
दारूमुक्त निवडणूककोणतीही निवडणूक पैसे आणि दारूशिवाय होतच नाही, हे आजवरचे गडचिरोलीमधील चित्र. पण यावेळी ‘दारूमुक्त निवडणूक’ हे ब्रिद घेऊन मुक्तिपथ अभियानाच्या कार्यकर्त्यांनी नव्याने जागृती सुरू केली. दारू वाटणाऱ्यांना मतदान करायचेच नाही, असा उलट पवित्रा घेत सुरू झालेल्या या जागृतीला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ असे घोषवाक्य लिहीलेले लक्षवेधी फलक आज गडचिरोली शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लागले आहेत. त्यातून काय बोध घ्यायचा ते दारू पाजणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते घेतीलच, पण लोकशाही प्रक्रियेतील मतदानाचे पवित्र कार्य पूर्ण शुद्धीत राहून आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून लोक पार पाडतील, असा विश्वास डॉ.अभय बंग व्यक्त करतात.