राज्यात व जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आठ दिवसांपूर्वीच शासनाने साेमवार ते शुक्रवार दरम्यान बाजारपेठ उघडण्यावर प्रतिबंध घातले आहेत. तर शनिवार व रविवारी कडक लाॅकडाऊनचे पालन करायचे आहे. मात्र गडचिराेलीसह जिल्हाभरात काेणतेही निर्बंध पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. गडचिराेली शहरातील संपू्र्ण बाजारपेठ साेमवारी व मंगळवारी उघडण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त जेवढी गर्दी बाजारपेठेत राहत नाही. तेवढी गर्दी मंगळवारी उसळली हाेती.
कापड दुकानांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळे काही ग्राहकांच्या रांगा लागल्या हाेत्या. मागील आठ दिवसांमध्ये काेराेनाची लाट गंभीर स्वरूप धारण करीत आहे. मंगळवारी एकाच दिवशी सुमारे २० नागरिकांचा मृत्यू झाला तर ३७० काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. अशी गंभीर स्थिती असतानाही नियम ताेडून बाजारपेठ उघडली जात आहे. प्रशासकीय यंत्रणा मात्र दुकानदारांवरही काेणतीही कारवाई करीत नसल्याने दुकानदारही बिनधास्त झाले आहेत.
बाॅक्स
कापड दुकानांमध्ये शटर बंद करून विक्री
सर्वाधिक गर्दी कापड दुकानांमध्ये उसळली हाेती. दिवसभर दुकानात पाय ठेवायलाही जागा नव्हती. सायंकाळी पाच वाजता दुकाने बंद करण्याचा निर्णय स्वत:च दुकानदारांनी करून घेतला. पाच वाजतानंतरही ग्राहकांची गर्दी कायम असल्याने काही कापड दुकानदारांनी ५ वाजल्यानंतर शटर बंद करून कापडांची विक्री केली.
नागरिकांमध्ये लाॅकडाऊनची भीती
राज्यात कधीही लाॅकडाऊन लागू शकते अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. लग्नाच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. लाॅकडाऊन लागल्यास कपडे मिळणार नाहीत, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कापड दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळत आहे. तसेच सामान्य ग्राहकही किराणा व इतर वस्तूंची साठवणूक करण्यावर भर देत आहेत.
गुजरी हे गर्दीचे प्रमुख केंद्र
दैनिक गुजरीमध्ये साेशल डिस्टन्सिंगचे काेणतेही नियम पाळले जात नाहीत. व्यापारीवर्ग एकमेकांना लागूनच दुकाने लावतात. रस्तेही अतिशय लहान आहेत. त्यामुळे ग्राहकांची या ठिकाणी माेठी गर्दी उसळते. गडचिराेली शहरातील हे एक गर्दीचे प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना एकमेकांपासून अंतर ठेवून बसविण्याची गरज आहे. नियमाचा भंग करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.