मंगळवारी बैठक : राकाँ, आविसंला किती पदे मिळणार? गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करण्यात आली आहे. सदर सत्ता स्थापन करताना भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस व आविसंची मदत घेतली आहे. आता जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक २९ मार्च रोजी होणार असल्याने भाजपमधून कुणाची वर्णी सभापती पदी लागते. याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांसह जिल्हावासीयांचेही लक्ष लागून आहे. शिवाय सत्ता स्थापनेसाठी मदत करणाऱ्या आविसं व राकाँला आणखी किती पदे दिले जातात. याविषयीही उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला आहे. त्यानुसार भाजपच्या उमेदवार अध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. तर आदिवासी विद्यार्थी संघाला उपाध्यक्ष पद देण्यात आले. आता चार सभापती पदांची निवडणूक २९ मार्च रोजी होणार आहे. सुरूवातीला भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व एक अपक्ष अशी आघाडी करून २६ सदस्यांचे संख्याबळ जुळविण्यात आले होते. मात्र यात गोंधळ उडाल्याने आविसं हा नवा मित्र आघाडीत जोडावा लागला. त्यामुळे अगदी सुरूवातीला ठरल्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्ष पद व एक सभापती पद, शिवाय अपक्षाला एक सभापती पद असा फार्मुला होता. आता मात्र एक नवा जोडीदार आल्याने या सात सदस्यांवर एक उपाध्यक्ष पद देण्यात आले व आणखी एक पद दिले जाणार असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाच सदस्यांवर एक सभापती पद मिळण्याची शक्यता आहे. या पदामध्ये बांधकाम विभागाबरोबरच पॉवरफुल आरोग्य विभागही जोडून दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकच पद आता नव्या समिकरणानुसार येईल, अशी शक्यता आहे. भाजप आपल्याकडे दोन सभापती पद ठेवेल, असे सांगण्यात येत आहे. या सभापती पदावर भाजप कुणाची वर्णी लावतो हे २९ मार्चला स्पष्ट होईल. २८ मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी भाजप व मित्र पक्षांची या संदर्भात बैठक होणार असल्याचे वृत्त आहे. यात अंतिम निर्णय घेतला जाईल. भाजपच्या आपल्याकडे कृषी व पशुसंवर्धन तसेच महिला बालकल्याण हे दोन विभाग ठेवू शकतो व या दोन्ही सभापती पदावर भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले सदस्यांना ते संधी देतील, अशी पक्षाच्या वर्तुळात चर्चा आहे.
सभापती पदावर कुणाची लागणार वर्णी
By admin | Published: March 25, 2017 2:13 AM