दोन नावांची चर्चा : १३ ला व्यवस्थापन मंडळाची बैठक गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिव पदी कुणाची वर्णी लागणार याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिवाचे नाव १३ जानेवारी रोजी होणाऱ्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत जाहीर होण्याची शक्यता आहे. कुलसचिव पदासाठी डॉ. अमुदाला सुदर्शन चंद्रमौर्य व डॉ. ईश्वर श्रावण मोहुर्ले या दोघांचे नाव असल्याची माहिती आहे. डॉ. इरपातेच्या राजीनाम्यानंतर कुलसचिव पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. एकूण २७ अर्जापैकी २४ उमेदवारांनी सेवा पुस्तिका जोडली नाही. तसेच इतर कारणांनी काही अर्ज पडताळणी समितीने रद्द केले. तर केवळ तीन अर्ज ग्राह्य धरण्यात आले. यामध्ये डॉ. जफर जावेद खान, डॉ. अमुदाला चंद्रमौर्य, डॉ. ईश्वर मोहुर्ले यांचा समावेश होता. त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. ३ जानेवारीला कुलसचिव व लेखाधिकारी पदासाठी मुलाखती कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, प्रभारी कुलसचिव दीपक जुनघरे, कोल्हापूर व अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव व्यवस्थापन मंडळाचे समीर केने व शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूरचे प्राचार्य डॉ. अंजली हस्तक यांच्या समितीने मुलाखती घेतल्या. या मुलाखतीदरम्यान डॉ. जफर जावेद खान हे आले नाहीत. त्यामुळे दोनच उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. तसेच लेखाधिकारी पदासाठी डॉ. ईश्वर मोहुर्ले यांचा एकमेव अर्ज ग्राह्य असल्याने त्यांची मुलाखत झाली. आता कुलसचिव पदाचे नाव१३ जानेवारीला व्यवस्थापन समितीच्या बैठकीत जाहीर होण्याची शक्यता आहे. तर ग्रंथपाल पदासाठी आलेले अर्ज पडताळणी समितीने रद्द केल्यामुळे पुन्हा अर्ज मागविले जाणार असल्याची माहिती आहे.
कुलसचिवपदी कुणाची वर्णी लागणार?
By admin | Published: January 08, 2017 1:32 AM