महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : ज्या कार्यकर्त्यांना पक्षाची तिकीट मिळाली नाही, त्या कार्यकर्त्यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. १७ जानेवारीपर्यंत उमेदवारांना नामांकन मागे घेता येणार आहे. मात्र अजूनपर्यंत एकाही उमेदवाराने नामांकन मागे घेतले नसल्याने कोण कोण रिंगणात कायम राहणार आणि कोण माघार घेणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.आरमोरी शहरात नगर परिषदेची पहिली निवडणूक २७ जानेवारीला होणार आहे. उमेदवारांच्या नामांकनांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. फक्त उमेदवारी मागे घेण्याची व चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. १० जानेवारीला छाणनीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध पक्ष, अपक्ष उमेदवारांनी आपल्या प्रभागात टीमसह लोकांच्या भेटीगाठी घेणे सुरूवात केली आहे. शहरात फक्त आणि फक्त निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे. आपल्या पक्षाचा व गटाचा उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी सर्वांनीच प्रयत्न चालविले आहे. त्यामुळे निवडणुकीचा ज्वर वाढत चालला आहे.नगर परिषदेची पहिली निवडणूक असल्याने मागील अनेक महिन्यांपासून नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे स्वप्न पाहून कामे करणारी मंडळी निवडणुकीत उभी आहेत. राजकीय पक्षांनी उमेदवारी न दिल्यानंतरही अपक्ष म्हणून किंवा मिळेल त्या पक्षाकडून नामांकन दाखल केले आहे. आठही प्रभागात नगरसेवक पदासाठी मातब्बर उमेदवार एकमेकांसमोर ठाकले आहेत. सर्वच प्रभागात काट्याची टक्कर होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. प्रत्येक पक्ष व उमेदवार जातीय समिकरणांवर डोळा ठेवून एक गटामते मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. पक्ष व स्थानिक गटांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. उघडपणे प्रचाराला सुरूवात झाली नसली तरी गुप्तपणे प्रचार केला जात आहे.
माघार कोण घेणार, उत्सुकता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 1:33 AM
ज्या कार्यकर्त्यांना पक्षाची तिकीट मिळाली नाही, त्या कार्यकर्त्यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
ठळक मुद्देआरमोरी नगर परिषद निवडणूक : अपक्षांमुळे वाढणार पक्षीय उमेदवारांची डोकेदुखी