गडचिरोली : सहावी ते आठव्या वर्गाला गणित व विज्ञान विषय शिकवण्यासाठी विज्ञान शाखेत उत्तीर्ण असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना संधी देण्यात आली होती. मात्र, ठरवून दिलेल्या कालावधीत त्यांनी पात्रता पूर्ण न केल्याने त्यांना पदावनत करून त्यांची नियुक्ती इतर शाळांवर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या शाळांमध्ये विज्ञान व गणित विषय शिकवणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सहावी ते आठव्या वर्गाला शिकवण्यासाठी विषय शिक्षक असणे आवश्यक आहे. गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी बीएससी झालेले शिक्षक मिळत नसल्याने बारावी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची २०१७ मध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यांना पाच वर्षांच्या कालावधीत बीएससी पदवीधर होण्याचे बंधन घालण्यात आले होते. जे शिक्षक या कालावधीत पदवीधर झाले, त्यांना विषय शिक्षक म्हणून कायम करण्यात आले आहे. २७ शिक्षक पदवीधर झाले नाहीत, त्यांना पदावनत करून नवीन शाळेवर पाठवण्यात आले आहे.
त्यांच्या जागा आता रिक्त आहेत. या जागा भरण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे. विशेष म्हणजे विषय शिक्षकांची नियुक्ती करण्याचे पत्र २ जुलै रोजी प्राथमिक संचालकांनी काढले आहे. त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरूविषय शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषद शिक्षकांमधून करायची आहे. राज्यातील काही जिल्हा परिषदांनी शिक्षकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सेवाज्येष्ठता याद्या प्रकाशित केल्या जात आहेत. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू सुरूच झाली नाही. • सहावी ते आठवा वर्ग असलेल्या मोठ्या शाळा आहेत. मात्र, तेथेच विषय शिक्षकांची पदे रिक्त आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होत आहे.