आरमोरी : गेल्या १२ मे रोजी येथील कोविड केअर सेंटरचे नोडल अधिकारी डॉ.अभिजित मारबते यांना मारहाण करणाऱ्या लॉरेन्स गेडाम यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली. पण कोरोनासारख्या महामारीच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर हात उचलण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी पुढे आले नाही. त्यांचे हे सोयीस्करपणे वागणे नागरिकांना खटकत आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे पुत्र असलेल्या लॉरेन्स यांची ही कृती समर्थनीय नसल्याचे अनेक जण खासगीत बोलतात. पण डॉक्टरांचे मनोबल वाढविण्यासाठी स्थानिक तथा जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन या घटनेचा निषेध केला नाही. कोरोना आटोक्यात आणण्याकरिता मेडिकल, तहसील, पोलीस प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात कार्य सुरु आहे. सर्वात मोठा दुवा म्हणून वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे पाहिले जाते.
सरकारी यंत्रणेमार्फत सुरु असलेल्या कोविड़ केअर सेंटरमध्ये मोफत सेवा सुरु आहे. त्यातही चांगली सेवा देणाऱ्या डॉक्टरांची चर्चा सुरू असते. डॉ.अभिजित मारबते हे त्यापैकीच एक आहे. कोरोनोतून बरे होऊन घरी परतलेले नागरिक डॉ.मारबते यांचे नाव घेतात. अशा प्रतिमेच्या डॉक्टरवर हात उगारणे म्हणजे त्यांच्या सेवेचा अपमानच नाही तर त्यांचे मनोबल खचविण्याचा प्रकार आहे.
जिल्ह्यात आधीच डॉक्टरांची कमतरता आहे. बाहेरील डॉक्टर जिल्ह्यात काम करण्यास तयार नाही. अशा वातावरणात जे चांगली सेवा देत आहेत त्यांना प्रोत्साहित करण्याऐवजी मारहाण करण्याचा प्रकार घडणे आरमोरीकरांसाठी दुर्दैवी घटना ठरली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस या पक्षाचे पदाधिकारी अनेक सामाजिक प्रश्नांवर रस्त्यावर येऊन निदर्शने करतात, मात्र एका राजकीय नेत्याच्या मुलाच्या चुकीच्या वागण्याचा निषेध करण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. याबद्दल सामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.