लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : वीज पुरवठा करणाऱ्या साधनांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी आटाेपले जाते. यावर महावितरणचे लाखाे रूपये खर्च हाेतात. तरीही वादळवारा किंवा पाऊस सुरू हाेताच तसेच भर उन्हाळ्यातही वीज पुरवठा अचानक खंडित हाेतो. देखभाल दुरूस्ती केली असतानाही वीज पुरवठा का खंडित हाेतो, असा सहज प्रश्न ग्राहकांना पडताे. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे वीज पुरवठा आपाेआप खंडित हाेत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. गडचिराेली जिल्ह्यातील वीज लाईन जंगलातून गेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात विजेची समस्या अतिशय गंभीर हाेते. एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर किमान एक दिवस वीज पुरवठा सुरळीत हाेत नाही. जंगलात विजेचा बिघाड शाेधताना वीज कर्मचाऱ्यांच्याही नाकीनऊ येतात.
लाईट जाण्याची नेमकी कारणे काय?
प्रत्येक गावाला लाेखंडी खांबाद्वारे वीज पुरवठा केला आहे. विजेच्या तारेचा लाेखंडी खांबाशी संपर्क येऊ नये, यासाठी खांबाला चिनी मातीने बनलेले इन्सुलेटर बसविले आहे. या इन्सुलेटरला वीज तार गुंफली जाते. माती विजेची दुर्वाहक असल्यामुळे वीज प्रवाह खांबापर्यंत पाेहाेचत नाही. मात्र काही दिवसानंतर इन्सुलेटर पाऊस पडताच फुटतात. त्यामुळे वीज प्रवाह जमिनीत पाेहाेचून लाईन बंद पडते.हवेमुळे विजेच्या तारांचा एकमेकांशी संपर्क हाेऊन स्पार्किंग हाेते व वीज पुरवठा खंडित हाेतो. वीज खांबावर वीज पडल्यामुळे इन्सुलेटर फुटतात. उन्हाळ्यात अचानक विजेचा वापर वाढल्याने डीपीवरील फ्युज उडतात व वीज पुरवठा खंडित हाेतो. विजेचा शाॅक बसल्याची एखादी दुर्घटना घडल्यानंतर वीज पुरवठा खंडित हाेतो.
लाईट लगेच येऊन का जाते?एखादी दुर्घटना घडताच वीज पुरवठा खंडित हाेते. उपकेंद्रावरील ऑपरेटर पाच मिनिटानंतर पुन्हा वीज पुरवठा सुरू करून बघते. मात्र पुन्हा लाईट बंद पडल्यास वीज लाईनमध्ये काहीतरी बिघाड निर्माण झाला असल्याचा अंदाज येऊन महावितरणचे कर्मचारी कामाला लागतात.
ऑपरेटर वीज पुरवठा खंडित करताे का?पाऊस, वादळवाऱ्याला सुरूवात झाल्यानंतर वीज पुरवठा खंडित हाेते. यावेळी उपकेंद्रातील ऑपरेटर वीज पुरवठा खंडित करते, असा गैरसमज नागरिकांचा आहे. मात्र ऑपरेटर कधीच वीज पुरवठा खंडित करीत नाही. इन्सुलेटर फुटणे, वीज तारा तुटने अशा घटना घडल्यानंतर आपाेआप वीज पुरवठा खंडित हाेते.
वीज पुरवठा बंद झाला नाही तर.... - एखाद्या खांबावरील इन्सुलेटर फुटल्यानंतरही वीज पुरवठा सुरूच राहिल्यास हा वीज पुरवठा खांब, सभाेवतालच्या ओल्या परिसरात पसरेल. एवढ्या परिसरात एखादा प्राणी किंवा व्यक्ती गेल्यास त्याला विजेचा धक्का लागून ताे गतप्राण हाेऊ शकतो. त्यामुळे इन्सुलेटर फुटल्याने वीज पुरवठा आपाेआप खंडित हाेईल, अशी सिस्टिम महावितरणकडे आहे. - एखाद्या व्यक्तीला शाॅक लागला तर लागलीच वीज पुरवठा खंडित हाेतो. त्यामुळे त्याचा प्राण वाचू शकतो. - वीज पुरवठा खंडित न झाल्यास माेठी जीवितहानी हाेण्याची भीती राहते.