लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या काही दिवसांत सोशल मीडियाचे अनेक वाईट परिणाम बघायला मिळत आहेत. याच सोशल मीडियाचा आणखी एक विपरित परिणाम समोर येतोय, तो म्हणजे सोशल मीडियामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढत चालले आहे. हे प्रमाण असेच कायम राहिल्यास कुटुंब व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील अत्यंत व्यस्त आणि वेगवान जीवनशैलीमुळे अनेकांच्या आयुष्यात विविध स्तरावर सातत्याने तणाव वाढत चालला आहे. त्यात सोशल मीडियामुळे नात्यांवरही विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. याच सोशल मीडियामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहेत. सोशल मीडियाचे काही फायदे जरूर आहेत. मात्र, त्याचा अतिरेकी वापर त्रासदायक होत चालला आहे.
सोशल मीडियातील अनावश्यक वृत्तांमुळे मानसिक तणाव वाढत चालले आहेत. दोन समाजात विरोध निर्माण करण्याचे सर्वात मोठे व्यासपीठ सोशल मीडिया बनत आहे. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर हा भविष्यासाठी अतिशय धोक्याचा आहे. काही नागरिकांना तर सोशल मीडियावर नेहमी सतर्क राहण्याचे व्यसन जडले आहे.
स्वतंत्र जगायचे आहे ?कुटुंबात राहताना काही मर्यादा पाळाव्या लागतात. मात्र, या मर्यादांना काही जण बंधने समजतात. आपणाला स्वतंत्र जगायचे आहे, असे सांगून पतीपासून फारकत घेतात.
वर्षभरात किती घटस्फोट ?जिल्ह्यात वर्षभराच्या कालावधीत जवळपास २०० घटस्फोट होतात. ही आकडेवारी कुटुंब व्यवस्था धोक्यात आणणारीच आहे. पुढे हे प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे. ही धोक्याची घंटा आहे.
समेट किती प्रकरणांत ?न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणात न्यायालय दोघांत समेट घडवण्याचा प्रयत्न करते. दोघांचीही समजूत घातली जाते. मात्र, काही प्रकरणांत महिलेला घटस्फोट आवश्यक असतो. त्यावेळी मात्र न्यायालयाचा नाईलाज होते. अशा प्रकरणात न्यायालय घटस्फोट मंजूर करते.
काय आहेत घटस्फोटाची नेमकी कारणे ?
- सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवणे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे वैवाहिक संबंध संशयाच्या भोवऱ्यात येतात. सोशल मीडियामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालवल्याने संवाद कमी होतो.
- सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नात्यांमधील कमी होत चाललेला संवाद हा या घटस्फोटांचे महत्त्वाचे कारण आहे. आधीच नोकरीतील तणाव, आर्थिक जुळवाजुळव करताना पती-पत्नीच्या नात्यामध्ये अनेक अडचणी येत असतात. त्यात आता सोशल मीडियाचाही नात्यांवर परिणाम होऊ लागला आहे.
- सोशल मीडियाचा वापर करताना रात्री उशिरापर्यंत अनेकजण जागे राहतात. याचा थेट परिणाम सकाळी उठण्यावर होतो. कामाची वेळ १० वाजताची असेल तर ८ वाजेपर्यंत झोपून राहत असल्यामुळे उठल्याबरोबर कार्यालयात जाण्याची तयारी करावी लागते. परिणामी कुटुंबासोबत संवाद साधता येत नाही. याचा थेट परिणाम कुटुंबातील संबंधांवर दिसून येते. त्यामुळे सोशल मीडियाचा जपूनच वापर करणे आवश्यक आहे.