आरमोरी मार्गावर गतिरोधक निर्माण करा
गडचिरोली : गडचिरोली - आरमोरी या मुख्य मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर शहरात बसथांबा, व्यावसायिक दुकाने व शाळा असल्याने येथून विद्यार्थी व नागरिकांचे आवागमन असते. त्यामुळे मार्गावर दोन ते तीन ठिकाणी गतिरोधक उभारावे, अशी मागणी होत आहे.
कैकाडी वस्तीतील नागरिक सुविधांपासून वंचित
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात. मात्र, त्यांना नागरी सुविधा मिळत नाहीत.
अनेक कुटुंबांकडून शौचालयांचा गैरवापर
भामरागड : अनेक गावांत शौचालयात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक भरून ठेवतात. त्यामुळे त्याचा गैरवापर होत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, शौचालयाचा वापर होत नसल्याने गावात अस्वच्छता पसरत आहे.
वाहतूक नियमांना तिलांजली
सिरोंचा : दुचाकी वाहनावर तीन व्यक्ती बसून वाहन चालवीत असल्याचे चित्र नेहमीचेच झाले आहे. बालकांपासून जबाबदार नागरिकांपर्यंत सर्रास वाहतुकीचे नियम तोडून ट्रिपल सीट जात असतानाचे दृश्य नेहमीच पाहावयास मिळते.
मोबाईलमुळे पारंपरिक खेळांकडे दुर्लक्ष
अहेरी : मोबाईल व टीव्हीच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे विटी-दांडू, लंगडी, भोवरा, आदी खेळांकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील मुलेही आता टीव्ही व मोबाईल गेम अधिक खेळताना दिसून येतात.
शाळेच्या आवारातील विद्युत तारा हटवा
सिरोंचा : तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांच्या इमारतींवरून गेलेल्या विद्युत तारांमुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो. या विद्युत तारा काढण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ नये, याकरिता तारा हटवाव्यात.
कोरची तालुक्यातील रस्ते दुरुस्त करा
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगवले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
गेवर्धा-शिरपूर मार्गाचे रुंदीकरण करा
कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा- अरततोंडी- शिरपूर या मार्गावरील वर्दळ वाढल्याने मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघाताची शक्यता बळावली आहे. रुंदीकरणाची मागणी आहे.
बसस्थानक परिसरात टॅक्सींचे अतिक्रमण
धानोरा : गडचिरोली- धानोरा- मुरूमगाव मार्गावर सध्या चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. धानोराचे बसस्टँड रस्त्यालगतच आहे. स्वतंत्र जागा नसल्याने काळीपिवळी टॅक्सी व इतर खासगी बसेस या ठिकाणी अतिक्रमण करून दररोज अनेक प्रवासी बसवून वाहतूक सुरू आहे.
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या
गडचिरोली : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक, तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. शाळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.
अनेक नागरिक शिधापत्रिकेपासून वंचित
कुरखेडा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना शिधापत्रिका मिळाली नसल्याने अजूनही ते वंचित आहेत. तहसील कार्यालयात परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतरही तालुक्यातील एपीएल नागरिकांना शिधापत्रिका कार्ड देण्यात आले नाही.
सामान्य रुग्णालयातील लिफ्ट सुरू करा
गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. लिफ्टची व्यवस्था केल्यानंतर केवळ दोन ते तीन दिवस लिफ्ट सुरू होती. त्यानंतर लिफ्ट बंद करण्यात आली. लिफ्ट सुरू करण्याची मागणी होत आहे.
बाल कामगारांचा सर्रास वापर
गडचिरोली : कायद्याने बाल कामगार ठेवता येत नसले तरी अनेक भागांत बाल कामगारांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रतिष्ठानांत बालमजुरांचा वापर होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.