गोपाल लाजुरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : चार महिन्यांपूर्वी छत्तीसगड राज्यातून काेरची तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींनी सुरुवातीचे तीन महिने बराच धुमाकूळ घातला. त्यात धानासह कडधान्य पिकाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान केले. वनविभागाकडून वेळीच पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आतापर्यंत २२ लाख ९२ हजार ३३४ रुपयांची भरपाई देण्यात आली. यात गडचिराेली व वडसा वनविभागातील गावांचा समावेश आहे.छत्तीसगड राज्यातून काेरची तालुक्यात दाखल झाल्यानंतर हत्तींच्या कळपाने काेरची, कुरखेडा, धानाेरा, आरमाेरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ माजवून धान, उडीद, मूग, तुरी आदी पिकांचे नुकसान केले. यात धानाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
२० घरांची भरपाई मिळणार काय?गडचिराेली वनविभागात येणाऱ्या धानाेरा तालुक्याच्या मुरूमगाव वनपरिक्षेत्रातील २० घरे, गाेठे जंगली हत्तींनी उद्ध्वस्त केली. माेहफुलाच्या वासामुळे हत्तींनी या घरांवर हल्ला चढविल्याचे वनाधिकारी सांगतात. परंतु नुकसान भरपाईमध्ये या घरांचा समावेश करण्यात आला नाही. वनपरिक्षेत्र अधिकारी, गृह विभाग, बांधकाम अभियंता, ग्रामसेवक व तलाठी यांच्या समितीच्या अहवालानंतरच त्यांना भरपाई मिळणार आहे.
हत्ती रमले ‘टिपागडी’च्या प्रेमात- मागील वर्षीच्या ऑक्टाेबरपासून डिसेंबर महिन्यापर्यंत चार तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये धुमाकूळ माजवून पुन्हा परतीच्या वाटेला लागलेले २३ जंगली हत्ती सध्या कुरखेडा तालुक्याच्या गांगसायटाेला (हेटळकसा) बिटात वावरत आहेत. याच भागात टिपागडी नदी एकाच मार्गाला सातवेळा ओलांडून जाते. हा परिसर मालेवाडा वनपरिक्षेत्रात येताे. मुबलक पाणी व भरपूर प्रमाणात बांबूचा चारा उपलब्ध असल्याने महिनाभरापासून हत्तींनी त्या भागात तळ ठोकला आहे, असे मालेवाडाचे आरएफओ स्वप्नील ढाेणे यांनी सांगितले.
बंगालच्या टीमकडून हाेत आहे माॅनिटरिंग- मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी बंगालमधून आलेली १२ सदस्यीय टीम महिनाभरापासून जंगली हत्तींच्या हालचालींवर देखरेख ठेवत आहे. तसेच कर्मचाऱ्यांकडून याेग्य माॅनिटरिंग सुरू आहे.
जंगली हत्तीच्या कळपाने ऑक्टाेबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत एकूण २१५ शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले. यामध्ये गडचिराेली वनविभागातील सर्वाधिक १९६ शेतकरी तर वडसा वनविभागातील १९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही सर्व प्रकरणे वनविभागाने मंजूर केली आहेत. गडचिराेली वनविभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १९ लाख ३४ हजार २३४ रुपये तर वडसा विभागात ३ लाख ५८ हजार १०० रुपयांची भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे.